धन्वंतरी तुलसी

1885

>> डॉ. दीपक केसरकर 

आजपासून तुलसी विवाहसोहळा सुरू होत आहे. शिवाय आज धन्वंतरी दिनही आहे. आपल्या अंगणात डोलणारी तुळस धन्वंतरीचेच प्रतिरुप आहे.

औषधी तुळस
बाजारात तुळशीचे पंचाग चूर्ण म्हणजे पानांचे चूर्ण, मंजिरी, मूळ अशा विविध स्वरूपात मिळते. जुनाट जखम, सूज, वेदना अशा ठिकाणी तुळशीची पाने पाण्यात वाटून त्याचा लेप केला तर जंतू मरून जखम लवकर भरते.
सूज, वेदना पण कमी होते. तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तुळशीची पाने चावून चावून खावीत.
हिरडय़ातून पू येत असल्यास तुळशीच्या पानांच्या रसाने गुळण्या कराव्यात.
सर्दी, खोकला, नाक गळणे या आजारात तुळशीची पाने, आलं, मिरे यांचा काढा बनवून घ्यावा. कफयुक्त खोकला, दमा, पाठदुखी, ताप ही लक्षणे असल्यास तुळशीच्या पानांचा रस, मध एकत्र करून देणे.
त्वचाविकारात तुळस खूप छान कार्य करते. तुळशीची पाने आणि मिरे एकत्र वाटून लावल्यास गजकर्णाची खाज कमी होते व 4-5 दिवसांत कीड मरून गजकर्ण बरे होते.
तुळशीचा रस घेतल्यास घाम खूप येतो. त्यामुळे तापाचा वेग झपाटय़ाने कमी येतो.

आहारात तुळस
आहारातही तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. पूर्वी अन्न साठवण्याच्या कोठारामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करायचे त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. धान्याचा दर्जा टिकून राहतो. हिंदुस्थानातील काही राज्यांमध्ये जेवणाआधी सूप प्यायला देतात त्यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करतात. यामुळे भूक वाढते आणि अन्न पचण्यास मदत होते. त्यासोबत जेवणातही भातामध्ये (कर्पूर तुळस) म्हणून एक प्रकार वापरला जातो. यामुळे भात सुवासिक होतो. जेवणात तुळस वापरल्यामुळे यकृताला उत्तेजन मिळते. पाचन व्यवस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे अन्नपदार्थाला स्वादिष्ट चव आणि सुगंध येतो.

सौंदर्यदायी तुळस
घरात असणाऱया टवटवीत तुळशीप्रमाणे आपला चेहरा टवटवीत असावा असं सगळय़ांना वाटत असावं त्यासाठी सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी 4-6 तुळशीची पाने चावून चावून खावीत. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. चेहरा तजेलदार होतो. त्याचप्रमाणे (हळद औ, आवळा औ मंजिष्ठा औ चंदन औ आंबेहळद औ मसूर) याचे तुळशीच्या रसात व्यवस्थित मिश्रण करून लेप करावा याने चेहऱयाची त्वचा मुलायम, टवटवीत तर होईल. त्याहीपेक्षा वारंवार येणारे पिंपल्स कमी होतील.

त्याग, समर्पण, सोशिकता, कणखरपणा असे सारे स्त्रीत्वाचे गुणधर्म असणारी… प्रत्येकाशीच नातं जपणारी तुळस… देवीदेवतांनाही प्रिय… औषधाचे अनेक गुणधर्म असलेली…  धार्मिकता आणि आरोग्य यांचा अजोड संगम असलेली… नकारात्मकता नष्ट करणारी, हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये तुळशीला आगळंवेगळं स्थान आहे. तिची  मूळं, फांद्या, पाने, मंजिरी अशा सर्वच अंगांचा वापर आपल्या शास्त्रात वर्णन केला आहे.  जगभरात तुळशीच्या 18 प्रकारच्या जाती आढळतात. तुळशीचा रस चवीला कडू, तिखट असून  ती किंचित पित्ताला वाढवते, परंतु कफ आणि वाताचे शमन करते. तुळशीच्या बिया मात्र स्निग्ध पिश्चिल (चिकट) शीत विर्याच्या आहेत. तुळस ही जंतुघ्न, दुर्गधिनाशक, वातहर, शोधहन, भूक वाढविणे, पचनास मदत करणे, हृदयाला बळ देणे, दमा कमी करणे, कफ पातळ करून बाहेर टाकणे, घाम आणणे, रक्ताभिसरण क्रिया सुधारणे, लघवीची जळजळ कमी करणे, त्वचाविकार दूर करणे, यकृताचे कार्य सुधारणे  असे तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. फक्त वैद्यांच्या सल्ल्यानुसार तिचा उपयोग करावा. कारण प्रत्येकाची प्रकृती, आजार वेगवेगळे असतात. त्यानुसार प्रमाण आणि घ्यायची पद्धत बदलते.

परदेशातील बेसील लिव्हज् आणि तुळस ही एकच वनस्पती आहे. तिथे पास्ता किंवा पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर ही पाने वापरली जातात. फक्त वातावरणातील बदलामुळे रंगात आणि आकारात थेडाफार फरक जाणवतो, मात्र त्यांच्यातील गुणधर्मामध्ये बहुतांश समानता जाणवते. सकारात्मक ऊर्जेने भरलेली ही वनस्पती… वातावरणात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य या वनस्पतीत आहे. पुरेसा सूर्यप्रकाश, मुबलक पाणी आणि आजूबाजूला स्वच्छता असली की, तुळस भरभरून वाढते आणि घरात भरभरून चैतन्य आणि आरोग्य देते.

तुळशीचे लग्न…
आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. उत्तम संतानप्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. तुळशीचे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव सुरू करण्यात आला.

तुळशीपत्राचे महत्त्व
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी तुळशीचे उपयोग सर्वज्ञात आहेत. त्या दृष्टीनेही दारात-अंगणात तुळशीचे झाड असणे महत्त्वाचे ठरते. अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याने त्या ठिकाणी दुष्ट शक्तींचे तरंग व जीवजंतू येत नाहीत. म्हणून प्रसादावर तुळशीचे पान ठेवले जाते. दान देताना वर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत त्यातूनच रूढ झालेलाआहे.  श्रीकृष्णांची सुवर्ण व रत्न यांच्या वजनाने तुला करत असताना तुळशीच्या पानाचे महत्त्व संपत्तीपेक्षा अधिक असते हे सिद्ध झाले. विष्णू ही देवता शरीरातील चेतासंस्थेशी संबंधित असते आणि म्हणूनच तुळशी विष्णूला व श्रीकृष्णांना प्रिय समजली जाते. शास्त्रीयदृष्टय़ा तुळशीचे लग्न लावून हिंदुस्थानी संस्कृतीने लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखले आहे.

कृष्ण तुळस आणि पांढरी तुळस
मुख्यतः कृष्ण तुळस आणि पांढरी तुळस असे दोन भेद ग्रंथात वर्णन केले आहेत. आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील तुळस वापरावी  असा गंथाधार आहे. कृष्ण तुळस ही सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे. या दोघांच्या कार्यात फरक एवढाच पडतो की, काळी तुळस लवकर परिणाम दाखवते. पांढऱया तुळशीला राम तुळस असेही म्हटले जाते. तसेच कापरासारखा वास येणारी तुळस कर्पूर तुळस म्हणून ओळखली जाते. लिंबासारखा वास येणारी तुळसही आहे. तुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. सर्व प्रकारच्या तुळशींना त्यांचा स्वतःचा असा एक वेगळा गंध असतो.

तुळशीच्या मंजिऱ्या
एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी. ती म्हणजे तुळशीला मंजिऱया आल्या की, तुळशीच्या पानांतील सक्रिय तत्त्व कमी होतात म्हणून मंजिरी येण्यापूर्वीच औषधांसाठी तुळशीची पाने काढावीत. मंजिऱ्या या स्निग्ध पिश्चिल (चिकट) आणि शीत गुणाच्या असतात. त्या पाण्यात भिजवल्या की चिकट बोळ तयार होतो आणि हा बोळ औषधी स्वरूपात खूप उपयोगाला येतो. ज्यांना सकाळी मलप्रवृत्ती करताना जोर द्यावा लागतो त्याने एक चमचा तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून घ्यावे. तुळशीच्या बियांमुळे लघवी साफ होण्यात मदत होते. लघवीची जळजळ, मूत्राशयाला सूज, मूतखडा या लक्षणात तुळशीच्या मंजिऱ्यांचा चांगल्या उपयोग होतो. अंगात कडकी (उष्णता) असल्यामुळे  शारीरिक थकवा असेल तर तुळशीच्या बियांची खीर बनवून घ्यावी.

बदलत्या वातावरणावर गुणकारी 
सध्या बदलत्या वातावरणामुळे आणि आपल्या चुकीच्या खानपानामुळे  केस गळतात, थकवा, शारीरिक कमजोरी असे अनेक प्रकारचे त्रास होतात. तुळशीची पान चावून खाल्यात घाम वाढतो. रक्ताभिसरण सुधारते म्हणून रक्तातील विषारी घटक घामातून बाहेर टाकले जातात. त्यामुळे त्वचाविकार कमी व्हायला मदत होते. शरीरावर गजकर्ण आल्यास तुळशीची पाने चोळावी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या