सचिनवर स्लेजिंग करण्याची कुणाचीच हिंमत नव्हती, पाकिस्तानी क्रिकेटपटूची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. केवळ मैदानातच नाही, तर मैदानाबाहेरील त्याच्या संयमी व्यक्तिमत्वाने त्याने क्रिकेटप्रेमींच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. असं असलं तरी, त्याच्या फलंदाजीपुढे भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळायचं, असा खुलासा एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली याने एका जाहीर कार्यक्रमात त्याचे अनुभव सांगितले. पाकिस्तानी टेलिव्हिजन विश्वात तो बासित अली शो नावाचा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमात त्याने टीम इंडियासोबत खेळताना दोन्ही संघात जी बोलाचाली व्हायची त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी विकेटकीपर नयन मोंगिया हा सर्वाधिक स्लेजिंग (शेरेबाजी) करत असे. त्याच्याकडून जी शेरेबाजी व्हायची त्याबाबत मी इथे सांगू शकत नाही. अजय जडेजा याच्याकडूनही बऱ्यापैकी स्लेजिंग होत असे, असं अली याचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघाकडून सर्वात जास्त स्लेजिंग झालेले क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि विनोद कांबळी हे होते. संघातले खेळाडू या दोघांनाच सर्वाधिक लक्ष्य करत असत. पण, सचिन तेंडुलकर मैदानावर उतरायचा तेव्हा त्याच्यावर शेरेबाजी करायची कुणाचीच हिंमत नसायची, अशी कबुली त्याने या जाहीर कार्यक्रमात दिली आहे.