बावखळेश्वर मंदिराच्या जागेचा बेकायदेशीर वापर, ‘एमआयडीसी’चे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

513

पावणे येथील एमआयडीसीची जागा बळकावून त्यावर बेकायदेशीरपणे बावखळेश्वर मंदिर उभारल्याप्रकरणी तसेच जागेचा सुमारे 11 वर्षे वापर केल्याप्रकरणी एमआयडीसीने ट्रस्टला सुमारे 10 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. तसे प्रतिज्ञापत्रच एमआयडीसीच्या वतीने आज हायकोर्टात दाखल करण्यात आले.

भाजप नेते गणेश नाईक यांचे नातेवाईक असलेले संतोष तांडेल हे बावखळेश्वर मंदिराचे ट्रस्टी असून 2009 सालापूर्वी पावणे येथील एमआयडीसीच्या जागेवर ट्रस्टच्या वतीने बावखळेश्वर मंदिर उभारण्यात आले. मंदिर प्रशासनाने एमआयडीसीची 1.34 लाख चौ. मी. जागा वापरली असून हे मंदिर बेकायदेशीर असल्याने ते जमीनदोस्त करावे अशी मागणी करत संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. हायकोर्टाने या याचिकेची दखल घेऊन बेकायदा मंदिर तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार नोव्हेंबर 2018 साली बावखळेश्वर मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने जागेच्या बेकायदेशीर वापराप्रकरणी 5 कोटी 80 लाख 37 हजार 868 रुपये तसेच मंदिर तोडण्यासाठी झालेला खर्च 4 कोटी 6 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश एमआयडीसी तसेच सिडकोला दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने प्रतिज्ञापत्र सादर करत या प्रकरणी ट्रस्ट तसेच संबंधितांना नोटीस बजावली असल्याचे खंडपीठाला सांगितले. हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राहय़ धरत याचिका निकाली काढली.

आपली प्रतिक्रिया द्या