आयपीएलसाठी बीसीसीआयचा आयसीसीशी पंगा

777

बीसीसीआयची महत्वाची बैठक येत्या 17 जुलैला पार पडणार आहे. यंदाच्या मोसमातील आयपीएलचे भवितव्य, आंतरराष्ट्रीय दौऱ्यांची आखणी, स्थानिक मोसमाचे वेळापत्रक, चीनी कंपनी व्हीकोची स्पॉन्सरशिप या सर्व महत्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा वरून यावर निर्णय होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयने यावेळी आयसीसीशीही पंगा घेतला आहे. आयसीसीकडून टी-20 वर्ल्ड कपबाबतचा निर्णय घेण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे आता आयसीसीच्या निर्णयाची वाट बीसीसीआय बघणार नाही. आम्ही आयपीएलच्या तयारीला लागणार आहोत अशी भूमिका बीसीसीआयकडून घेण्यात आली आहे. एका इंग्रजी दैनिकामधून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

सप्टेंबर – ऑक्टोबरमध्येच होणार

सध्या जगभरात क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत एनबीएला सुरूवात झालीय. बुंडेस लीगा, इंग्लिश प्रीमियर लीग, एफए कप या फुटबॉल स्पर्धाही सुरू झाल्यात. ऑस्ट्रेलियात रग्बी या खेळाच्या स्पर्धेचा श्रीगणेशा झालाय. मग आपण मागे का आहोत. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे बीसीसीआयचे अरूण धुमळ यावेळी म्हणाले. ऑलिम्पिक व टी-20 कर्ल्ड कपसारख्या मोठय़ा स्पर्धांच्या आयोजनासाठी अडचण निर्माण होऊ शकते. पण स्थानिक स्पर्धा खेळवता येऊ शकतात, असे अरूण धुमळ यावेळी म्हणाले.

स्पर्धा होणार कुठे?

टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला तरी आयपीएल स्पर्धा ही हिंदुस्थानात होऊ शकत नाही. कारण सध्या हिंदुस्थानात कोरोनाचा वाढतच चालला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा ही युएईतच पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण बीसीसीआय व आयपीएल पदाधिकाऱयांकडून ही स्पर्धा हिंदुस्थानात घेण्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. ज्या शहरात कोरोनाचा कहर कमी प्रमाणात आहे त्या शहरांमध्ये या स्पर्धेच्या लढती खेळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आयपीएलमधून मिळणारा पैसा खेळाडू व देशासाठीच
जेव्हा देशामध्ये सुरक्षित वातावरण होईल तेव्हाच आयपीएल खेळवण्यात येईल. आयपीएलमधून मिळणारा पैसा हा खेळाडू व देशाच्या विकासासाठीच वापरण्यात येतो. सौरभ गांगुली, जय शहा किंवा माझ्या खिशात पडत नाही, असे अरूण धुमळ यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या स्पर्धा होण्याची शक्यता

हिंदुस्थानात आयपीएलसह रणजी, दुलीप, विजय हजारे, देवधर, इराणी, सय्यद मुश्ताक अली व कॉर्पोरेट या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शिवाय महिलांसाठीही वेगवेगळ्या स्पर्धा खेळवण्यात येतात. एरव्ही ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणारे क्रिकेट कॅलेण्डर आता पुढे ढकलण्यात येईल. यात वाद नाही. त्यामुळे बीसीसीआयकडून महत्वाच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला जाईल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या