
बीसीसीआयकडून ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी करारबद्ध क्रिकेटपटूंच्या नावांची घोषणा करण्यात आली. विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह या कसोटी, वन डे व टी-20 या तिन्ही प्रकारांत खेळणाऱया क्रिकेटपटूंना ए प्लस ग्रेडमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ाचे बी ग्रेडमधून ए ग्रेडमध्ये तर मुंबईकर अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचे सी ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये प्रमोशन करण्यात आले आहे. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकी गोलंदाजांची सी ग्रेडमध्ये घसरण करण्यात आली आहे.
…तरीही धवन ए ग्रेडमध्ये
शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत बहुतांशी वेळा बेंचवरच बसावे लागले होते. तसेच कसोटी क्रिकेटमध्येही त्याला संघात स्थान देण्यात येत नाहीए. याचा अर्थ तो आता फक्त हिंदुस्थानच्या वन डे संघात खेळतो. मात्र तरीही त्याचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच नवदीप सैनीला दुखापतीमुळे मागील मोसमात जास्त क्रिकेट खेळता आले नाही तरीही त्याला सी ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे.
गिल, अक्षर, सिराजची एण्ट्री
बीसीसीआयकडून या वर्षी नव्या खेळाडूंचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. शुभमन गिल, मोहम्मद सिराज या दोन्ही खेळाडूंनी कोरोनाच्या काळातील दौऱयांमध्ये चमकदार कामगिरी केली. तसेच अक्षर पटेल याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ठसा उमटवला. या तिन्ही खेळाडूंची सी ग्रेडमध्ये एण्ट्री झाली आहे.
सात, पाच, तीन व एक कोटीचा करार
बीसीसीआयकडून चार गटांमध्ये खेळाडूंना करारबद्ध करण्यात येते. ए प्लसमधील खेळाडूंना सात कोटी, ए ग्रेडमधील खेळाडूंना पाच कोटी, बी ग्रेडमधील खेळाडूंना तीन कोटी व सी ग्रेडमधील खेळाडूंना एक कोटी कराराअंतर्गत देण्यात येतात.
मनीष, केदार बाहेर
मनीष पांडे व केदार जाधव यांना करारामधून वगळण्यात आले आहे. मनीष पांडेला संधी देण्यात आल्या आहेत, पण त्याला आपली चुणूक दाखवता आलेली नाही. केदार जाधवही सातत्याने अपयशी ठरीत आहे. भुवनेश्वरकुमारला मात्र ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये का टाकण्यात आले हे समजण्यापलीकडे आहे. दुखापतीमुळे तो काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता, पण पुनरागमन केल्यानंतर त्याने शानदार कामगिरी करीत हिंदुस्थानला विजय मिळवून दिलेत. आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याचा विचार करण्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याची घसरण योग्य नव्हे, असा सूर यावेळी उमटला आहे.
ए प्लस ग्रेडमधील खेळाडू
विराट कोहली
रोहित शर्मा
जसप्रीत बुमराह
ए ग्रेडमधील खेळाडू
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जाडेजा
चेतेश्वर पुजारा
अजिंक्य रहाणे
शिखर धवन
लोकेश राहुल
मोहम्मद शमी
इशांत शर्मा
रिषभ पंत
हार्दिक पांडय़ा
बी ग्रेडमधील खेळाडू
रिद्धीमान साहा
उमेश यादव
भुवनेश्वरकुमार
शार्दुल ठाकूर
मयांक अग्रवाल
सी ग्रेडमधील खेळाडू
कुलदीप यादव
नवदीप सैनी
दीपक चहर
शुभमन गिल
हनुमा विहारी
अक्षर पटेल
श्रेयस अय्यर
वॉशिंग्टन सुंदर
युजवेंद्र चहल
मोहम्मद सिराज

























































