
सामना ऑनलाईन । राजकोट
हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यानच्या कसोटी मालिकेस 4 ऑक्टोबरपासून राजकोटमध्ये प्रारंभ होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याला अवघे तीन दिवस शिल्लक असताना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. ‘बीसीसीआय’ने राजकोटच्या खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी आपले क्युरेटर पाठविल्याने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’च्या संघ व्यवस्थापनाला विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान आणि उसळत्या खेळपट्टय़ा हव्या आहेत, मात्र त्यांनी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला विश्वासात न घेता दलजीत सिंह, विश्वजीत पडियार या आपल्या क्युरेटर्सला राजकोटला खेळपट्टीची बनवण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी पाठवले. बीसीसीआयच्या या एकतर्फी निर्णयामुळे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशने आपली नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत ज्या मैदानावर सामना भरकला जातो त्या संघटनेचे क्युरेटर हे खेळपट्टी बनवतात, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयने खेळपट्टीच्या देखभालीसाठी स्वत:चे क्युरेटर पाठवायला सुरुवात केली आहे. ‘जर बीसीसीआयला खेळपट्टय़ांची इतकीच चिंता असेल तर प्रत्येक मैदानासाठी त्यांनीच क्युरेटरची नेमणूक करावी, मग स्थानिक लोकांची गरजच भासणार नाही. बाहेरून येणाऱया क्यक्तींपेक्षा स्थानिक क्युरेटरला मैदानाची जास्त माहिती असते.’ त्यामुळे ‘बीसीसीआय’चा हा निर्णय सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आजिबात पटलेला नाही.
‘सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे खेळपट्टी बनवणारे प्रगत क्युरेटर काम करतात. शिवाय सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ‘बीसीसीआय’शी अनेक वर्षांपासून संलग्न आहे. गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या मैदानावर सामने भरवले आहेत. असे असतानाही ‘बीसीसीआय’ स्वत:चे क्युरेटर खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाठवत असेल तर हे चुकीचे आहे. यामुळे चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळपट्टीबद्दल आक्षेप घेतले तर त्याची जबाबदारी बीसीसीआयलाच घ्यावी लागेल. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याला जबाबदार राहणार नाही.’
-निरंजन शहा (सदस्य, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन)



























































