बीसीसीआयमुळे एमसीएला जाग आली, स्थानिक मोसमासाठी हालचाली सुरू

389

देशातील स्थानिक स्पर्धा व आंतरराष्ट्रीय दौरे याबाबत निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची येत्या 17 जुलैला बैठक बोलावण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही (एमसीए) राष्ट्रीय स्पर्धा तसेच मुंबापुरीतील स्पर्धांशी निगडीत बाबींसाठी हालचाली करायला सुरू केली आहे. लवकरच क्रिकेट सुधारणा समितीची निवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांकडून देण्यात आली आहे. हीच समिती मुंबईतील विविध वयोगटातील संघांसाठी प्रशिक्षक व निवड समिती सदस्यांची निवड करणार आहे.

कांगा लीगकर पाणी
कांगा लीग ही स्पर्धा जणू मुंबई क्रिकेटची ओळखच. पावसाळ्यात खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेसाठी खेळाडू जीवाचे रान करीत असतात. जुलै – ऑगस्ट पासून या स्पर्धेला सुरूवात होते. पण कोरोनामुळे या स्पर्धेवरही पाणी फेरले आहे. ही स्पर्धा होणार नसल्याचे सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले.

हॅरीस व गाईल्स शिल्ड शाळा सुरू होण्यावर अवलंबून
हॅरीस व गाईल्स शिल्ड या दोन स्पर्धा शाळा केव्हा सुरू होताहेत यावर अवलंबून असतील. तसेच पोलिस शिल्ड या स्पर्धेबाबतही आत्ताच काही सांगू शकत नाही. कारण पोलिस जिमखाना आता कोरोना सेंटर बनवण्यात आले आहे. पुरूषोत्तम, कॉम्रेड शिल्ड स्पर्धा होऊ शकतात, असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

रणजी जेतेपद महत्त्वाचे
मुंबईच्या क्रिकेट संघाला गेल्या रणजी मोसमात अपेक्षेला अनुसरून कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यंदा रणजीचे जेतेपद मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व काही बंद असल्यामुळे क्रिकेट सुधारणा समितीच निवडली गेली नाही. तर मग मुंबई संघाच्या प्रशिक्षकाची निववड कशी काय होऊ शकते, असा सवालही यावेळी उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या