श्रीसंतला बीसीसीआयचा दिलासा; आजीवन बंदी हटवली

656

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने ( बीसीसीआय) 36 वर्षांच्या क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर असलेली आजीवन बंदी उठवून त्याच्यावर सात वर्षांची बंदी लागू केली आहे. हा बंदीचा कालवधी 13 सप्टेंबर 2020 मध्ये संपणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे श्रीसंतला दिलासा मिळाला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवून ती सात वर्षांची करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआय लोकपालकडून सांगण्यात आले. 13 सप्टेंबर 2013 मध्ये श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2019 मध्ये श्रीसंतवरील आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आजीवन बंदी हटवण्यात आली होती.बीसीसीआयकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, बीसीसीआयने श्रीसंतला बाजू मांडण्याची संधी द्यावी आणि तीन महिन्यात शिक्षा निश्चित करण्याचे आदेश दिले होते. बीसीसीआयने श्रीसंतवरील आजीवन बंदीचा पुनर्विचार करावा, आजीवन बंदी ही खूप मोठी शिक्षा असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. जुलै 2015 मध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजीत चंदीला यांच्यासह 36 आरोपींना स्पॉच फिक्सिंगप्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने निर्दोष जाहीर केले होते.

आपण लिएंडर पेसला आदर्श मानतो. लिएंडर 45 वर्षांचा असताना ग्रँड स्लॅम खेळू शकतो. नेहरा 38 वर्षांचा असताना विश्वचषकात खेळू शकतो. तर मी का खेळू शकत नाही. मी आता फक्त 36 वर्षांचा असून आपले प्रशिक्षण सुरू असल्याचे श्रीसंतने या निर्णयानंतर सांगितले आहे. श्रीसंतने 2005 मध्ये श्रीलंकाविरुद्धचा सामन्यात नागपूर वनडेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. श्रीसंतने 27 कसोटी सामन्यात 37.59 सरासरीने 87 गडी बाद केले आहे. तर एकदिवसीय 53 सामन्यात 33.44 च्या सरासरीने 75 गडी बाद केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या