बुमराह, कृष्णा, राहुल, अय्यर, पंतचा कसून सराव

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील काही दिग्गज खेळाडू दुखापतीने ग्रस्त असून संघात पुनरागमन करण्यासाठी ते घाम गाळताहेत. जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेटमध्ये कसून सराव करताना दिसत असून वेगाने बरे होत आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र हे पाचजण संघात केव्हा पुनरागमन करतील याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. बुमराह सप्टेंबर 2022 पासून संघाबाहेर आहे, बुमराह आणि कृष्णा हे दोघेही पुनर्वसनाच्या अंतिम टप्यात आहेत. हे दोघे सध्या नेटमध्ये पूर्ण क्षमतेने गोलंदाजीचा सराव करताहेत, तर के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनीदेखील नेटमध्ये फलंदाजीचा सराव करण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.