
बीसीसीआयने तीन निवड समिती सदस्यपदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सरणदीप सिंग, देवांग गांधी व जतीन परांजपे या तीन निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे या तीन सदस्यांऐवजी नव्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने सुनील जोशी व हरविंदर सिंग यांची एमएसके प्रसाद व गगन खोडा यांच्याऐवजी निवड समितीत निवड केली. एमएसके प्रसाद व गगन खोडा यांचाही कार्यकाळ संपला होता. सरणदीप सिंग, देवांग गांधी व जतीन परांजपे यांनी आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी हिंदुस्थानी संघाची नुकतीच निवड केली होती.
…तरच तुम्हाला अर्ज करता येणार
निवड समिती सदस्यपदासाठी बीसीसीआयने काही अटी तयार केल्या आहेत. या पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती किमान सात कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 वन डे लढती किंवा 20 प्रथम श्रेणी सामने खेळलेला असावा. तसेच तो पाच वर्षे आधी निवृत्त झालेलाही असावा. शिवाय त्याची वयोमर्यादा 60 असायला हवी. त्यानंतर त्या व्यक्तीला निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज करता येणार आहे.





























































