आयपीएल आयोजनाचा पेच! इंग्लंड, यूएई शर्यतीत बीसीसीआयचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे आयपीएलचा मोसम अर्धवट राहिला. याचसह ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्यांमध्ये होणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आयपीएलचा मोसम पूर्ण झाला नाही तर बीसीसीआयला 2500 कोटींचे नुकसान होऊ शकते. हे बीसीसीआयला परवडणार नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने आयपीएलचा उर्वरित मोसम खेळवण्यासाठी कंबर कसली आहे. आयपीएलच्या उर्वरित लढतींच्या आयोजनासाठी इंग्लंड व यूएई हे दोन पर्याय बीसीसीआयने डोळय़ांसमोर ठेवले आहे. आगामी 29 मे रोजी होणाऱया बैठकीत बीसीसीआय याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 अमीन यांचा पाठिंबा यूएईला

बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांचा आयपीएल आयोजनासाठी यूएईला पाठिंबा आहे. इंग्लंडच्या तुलनेत यूएईमध्ये खर्च कमी होणार आहे. यूएईमध्ये हॉटेल, स्टेडियमसह सर्व बाबींवर जास्त खर्च होणार नाही. तसेच यूएईमध्ये रस्तेमार्गे स्टेडियमपर्यंत पोहचता येऊ शकते; पण इंग्लंडमध्ये प्रवास खर्च वाढतो. तसेच यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये पावसाचा मोसम असतो. त्यामुळे बहुतांशी लढती रद्दही होऊ शकतात. युएईमध्ये सप्टेंबर महिन्यात गारवा असतो. त्यामुळे खेळाडू व सपोर्ट स्टाफला सोयिस्कर असेल. याशिवाय याआधीही यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्याकडे ही स्पर्धा आयोजन करण्याचा अनुभव आहे. यामुळे यूएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित लढती होण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान–इंग्लंड कसोटी मालिकेवर परिणाम?

आयपीएलचा उर्वरित मोसम पार पडला नाही तर बीसीसीआयला 2500 कोटींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. त्यासाठी हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठीही बीसीसीआय प्रयत्न करील. बीसीसीआयने अशाप्रकारची विनंतीही इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडे केली होती, असे वृत्त समोर आले आहे; पण अशी कोणतीही मागणी किंवा विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली नसल्याचे इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

सप्टेंबरमध्ये स्पर्धा आयोजनासाठी प्रयत्न

आयपीएलचा उर्वरित मोसम खेळवण्यासाठी बीसीसीआयकडे ऑगस्ट ते सप्टेंबर महिना हेच पर्याय उपलब्ध आहेत. कारण जून-जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय दौरे व ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप असल्यामुळे ऑगस्ट अखेर व सप्टेंबर महिनाच रिकामा असणार आहे. पण या कालावधीत हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या तीन आठवडय़ांत आयपीएलच्या उर्वरित लढती खेळवण्यात येऊ शकतात.