बीडीडी चाळीतील पात्रता निश्चित नसलेली घरे संचालकांच्या नावावर करणार, पुनर्विकासातील अडथळा दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडीडी चाळींतील मूळ भाडेकरूचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसदारांमध्ये घर कोणाच्या नावे करावे, याबाबत एकमत होईपर्यंत ती घरे बीडीडी संचालकांच्या नावे केली जाणार आहेत. गृहनिर्माण विभागाच्या या निर्णयामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासामधील अडथळा दूर झाला आहे.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत. परंतु एखाद्या मूळ भाडेकरूचे निधन झाले असल्यास त्याच्या वारसदारांमध्ये सदर सदनिका कोणाच्या नावावर करायची यावरून वाद असतात. पण अशा प्रकरणात सुनावण्या घेऊनही त्या सुनावणीसाठी संबंधित वारसदार उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे वारसाहक्काने घरे हस्तांतरणाची प्रक्रिया प्रलंबित राहते. परिणामी सदनिकाधारकांची पात्रताही निश्चित करता येत नाही. त्यामुळे वारसदारांची नावे निश्चित होईपर्यंत ती सदनिका बीडीडी संचालकांच्या नावे ठेवण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. सदनिकाधारकाने आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे दिल्यानंतर ती सदनिका संबंधित व्यक्तीच्या नावावर केली जाईल, असेही गृहनिर्माण विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.