
‘म्हाडा’च्या माध्यमातून होणाऱया वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासाच्या धर्तीवर मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचा पुनर्विकास करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यामुळे 160 ते 200 चौरस फुटांच्या घरात राहणाऱया गोरगरीबांना 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळू शकणार आहे. याबाबत शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पालिका आयुक्तांना निवेदन दिले.
मुंबईत माझगाव-ताडवाडी, लव्हलेन, मुंबई सेंट्रल, आग्रीपाडा, परळ आदी भागांत पालिकेच्या 100 वर्षांपूर्वीच्या बीआयटी चाळी आहेत. या चाळी जुन्या झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे या चाळींसाठी विशेष धोरण तयार केल्यास 500 चौरस फुटांचे घर मिळेल किंवा पोलिसांप्रमाणे 15 लाखांत मालकीहक्काचे घर मिळू शकणार आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
ताडवाडीच्या स्थलांतरितांची प्रचंड परवड
माझगाव ताडवाडी बीआयटी चाळ क्रमांक 14, 15 व 16 या इमारती अतिधोकादायक असल्यामुळे तेथील सुमारे 220 कुटुंबीयांना सहा वर्षांपूर्वी माहुल येथे संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. या स्थलांतरितांना शाळा, कॉलेज, रुग्णालयाच्या गैरसोयीसह प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘बीआयटी’ चाळींचा पुनर्विकास तातडीने करण्याची मागणी केली जात आहे.



























































