
नरेंद्र मोदी केंद्रात जी कपटनीती वापरत आहेत तीच कपटनीती राज्यात देवेंद्र फडणवीस वापरत आहेत. खोत, जानकर, मुंडे या सगळ्या बहुजन नेत्यांना साईड लाइन केले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कपटी राजकारणापासून सावध व्हा, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर जिह्यातील महाप्रबोधन यात्रेची सांगता मंगळवारी सायंकाळी झालेल्या जाहीर सभेने झाली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या. जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्कप्रमुख उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेनेचे महिला आघाडीच्या राज्यसंघटक संजना घाडी, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, संभाजी शिंदे, गणेश वानकर, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, शहर उत्तरचे संपर्कप्रमुख काशिनाथ बासुतकर, प्रा. अजय दासरी, साईनाथ अंभगराव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, समन्वयक महेश धाराशिवकर, युवासेना विस्तारक शरद कोळी, पूजा खंदारे, अक्कलकोट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, दक्षिण तालुकाप्रमुख युवराज पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, शहरातील एमआयएम पदाधिकारी समीउल्ला शेख व त्याचे सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ता विष्णू सकल व श्रीमंत पवार यांच्यासह जवळपास 600 कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, देवेंद्रजी आज महापुरुषांचा अपमान होत आहे, तुमचे मंत्री महिलांबद्दल अपशब्द काढताहेत. तरीही तुम्ही गप्प आहात, असे कसे चालणार? मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करून मूर्खात काढण्याचा हा प्रयत्न आहे. मिंधे गटाच्या बंडाशी आमचा संबंध नाही, असे राज्यातील भाजपा नेते वारंवार सांगत होते. मात्र, मुंबई-सुरत, गुवाहाटी हा खर्च कोणी केला. अजय आयसर याला निती आयोगाचा उपाध्यक्ष कोणी केले, याची उत्तरे द्या, असा सवालही त्यांनी केला.
भाजपने एकनाथ शिंदे यांचे मांजर केले आहे. महाराष्ट्रातील सीमाभागात गाडय़ा फोडल्या, कन्नडी लोकांकडून अत्याचार केला जात असताना तुम्ही तोंडातून एक शब्दही काढला नाही. कारण, तुमच्यावर भाजपाचा मोठा दबाव आहे. तुमचे चारित्र्य हनन करून जनतेच्या मनात प्रतिमा मलीन करण्याचा कुटिल डाव भाजपचे नेतेमंडळी आज करीत आहेत. शिंदे गटातील शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, राहुल शेवाळे या नेत्यांच्या मागे चौकशी लावून त्यांचे राजकीय करियर पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपचे नेते करीत आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रकांत बावनकुळे, विनोद तावडे या बहुजन नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या टोळीने केला, असेही त्या म्हणाल्या.
संजना घाडी म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने पेटलेल्या विचाराच्या मशालीची धग तुमच्या मनात कायम ठेवा, ती विझू देऊ नका. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी ज्या पद्धतीने प्रतारणा केली जात आहे, त्याचा हिशेब आपल्याला चुकवायचा आहे. या 40 गद्दारांना येणाऱया विधानसभेत उत्तर द्यायचे आहे.
अनिल कोकीळ म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेचा तळतळाट तुम्हाला भोगावा लागणार आहे. राज्यातील जनता विरोधात आहे. लोक फक्त निवडणुकांची वाट पाहात आहेत. यावेळी फक्त शिवसेना म्हणजे शिवसेनाच. सोलापूर महापालिकेवर भगवा फडकावयाचा आहे, असेही ते म्हणाले.
























































