म्हशींसाठी काय पण…चुलत्या-पुतण्याची आईवडिलांना मारहाण, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतजमिनीच्या वाटणीवरून भावकीत भांडणे होणार यात काही नवीन नाही, पण म्हशींच्या हिश्श्यावरून चुलत्यासह भावडांनी एका तरुणाच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील सहजपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल घडली.

मोहन चंदर लोंढे, तुकाराम चंदर लोंढे, विशाल मोहन लोंढे, तेजस मोहन लोंढे, सचिन मोहन लोंढे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्ता किसन लोंढे (27, रा. सहजपूर ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता आणि आरोपी चुलत्यासह भावंडे आहेत. त्यांच्यात वाटणीवरून वाद सुरू होते. दत्ताच्या वाटणीला आलेल्या म्हशींच्या हिश्श्यावरून पाचही आरोपींमध्ये काल वादविवाद झाले.

त्यानंतर टोळक्याने म्हशीचा हिस्सा आम्हाला पण पाहिजे असे म्हणत, दत्ता यांच्या वडिलांसह आईला धक्काबुक्की करीत मारहाण केली. यामुळे दत्ताने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वाटाघाटीतून दोन्ही कुटूंबियामध्ये भांडण झाले असून, म्हशींच्या हिश्श्यासह इतर वाटणीबाबत मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.