मधमाशांचा अंगणवाडी सेविकांवर हल्ला

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या छतावर अंगणवाडी सेविकांची बैठक सुरू असताना आग्या मोहळाच्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यामध्ये 60 अंगणवाडी सेविकांना मधमाशांनी चावा घेतला. यात 17 अंगणवाडी सेविकांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी बुधवारी घडली.

औंढा नागनाथ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची बैठक महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने बुधवारी आयोजित केली होती. कार्यालयात जागा अपुरी असल्याने छतावर दुपारी अडीच वाजता ही बैठक सुरू होती. त्यावेळी अचानकपणे मधमाशांच्या मोहोळाने बैठकीत सहभागी महिलांवर हल्ला चढवला. त्यामुळे पळापळ झाली. जखमी अंगणवाडी सेविकांना औंढा नागनाथ येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. 17 जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

bee-attack1

आपली प्रतिक्रिया द्या