सिंहाची शिकार होत नसते, बीडमध्ये काकांचा शंखनाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

पराभव आपल्याला नवीन नाही, खचून जाऊ नका पुन्हा उभारी घेऊ मैदान जिंकण्यासाठी चांगला खेळाडू विरोधक असावा लागतो. डोंगर पोखरून उंदीर हाती लागला म्हणजे सिंहाची शिकार केल्याचा आव आणू नये. चार दोन बांडगुळे आपल्या विरोधात सतत ओकत असतात त्याकडे लक्ष देऊ नका. दुसर्‍यांच्या घरात आग लावणार्‍या मंडळीपासून सावध रहा. कोट्यवधींच्या कामाचा शुभारंभ करूनच आपण विधानसभेच्या कामाला लागू असे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कार्यकर्त्याच्या बैठकीत सांगितले आहे.

बीड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांशी असणार्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते रविवार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर, सतिश चव्हाण, विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी के.एस.के.च्या सभागृहात मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.

कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी अत्यंत रोखठोक आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की स्व.काकूंनी खूप विचार करून जबाबदार्‍या सोपवल्या आहेत त्या उगीच नाहीत. ज्या संस्था उभारल्या त्या हजारो कुटूंबे सांभाळत आहेत, संस्था जगली तरच लोक जगतील हा मुळ विचार स्व. काकुंनी केला आणि ही जबाबदारी आण्णांच्या खांद्यावर टाकली. हम दवा से नही तो दुवा से जिंदा है. पराभव आपल्यांला नवीन नाही, कार्यकर्त्यानो खचून जावू नका पुन्हा उभारी घेऊ, मैदान जिंकण्यासाठी चांगला खेळाडू विरोधक असावा लागतो. डोंगर पोखरून उंदीर हाती लागला म्हणजे सिंहाची शिकार केली असा काहींचा गैरसमज झालेला आहे. आण्णांसारखे सक्षम आणि सयंमी नेतृत्व आपल्या पाठीशी आहे आण्णांच्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. घरातील कर्ता आणि जबाबदार म्हणून त्यांच्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. घराची संस्कृती जो पाळत नाही तो जनतेचे काय भले करणार असा सवाल करून ते म्हणाले की चार दोन बाडगुंळे आपल्या विरोधात सतत बरळत असतात. त्याकडे लक्ष देऊ नका आमची जीभ कधी घसरू दिली नाही, दुसर्‍यांच्या घरात आग लावणार्‍या मंडळीपासून सावध रहा, असेही ते म्हणाले.