
सामना प्रतिनिधी। बीड
पठारी ,डोंगर दऱ्या, एका दिशेला गोदावरीचा सखल भाग तर विरुद्ध दिशेला बालाघाटच्या डोंगर दऱ्या असणाऱ्या बीड जिल्ह्यात कोब्रांची संख्या वाढली आहे. येथे सापाच्या तब्बल 26 प्रजाती आढळून येतात, फण्यावर 10 चा आकडा असणारा नाग आणि अतिविषारी कोब्रा, घोणस येथे क्वचित सापडायचा. पण गेल्या दोन चार वर्षांत कोब्रा आणि इतर विषारी नागांची संख्या अचानक वाढल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात एकूण सापाच्या 26 प्रजाती आढळतात यामध्ये कोब्रा, मण्यार, घोणस, फुरसे या विषारी ,मांजऱ्या हरणतोल या निम्न विषारी तर अजगर, डुरक्या घोणस, मांडूळ, धामण, धुळनागिन, काळतोडया, तस्कर, गवत्या, कवडी, सेलाटी, विरोळा, कुकरी, चित्रांगना, वाळा या बिनविषारी प्रजाती आढळतात, बिनविषारी जाती नेहमी कोठे ही म्हणजे शहरी, ग्रामीण भागासह शेतात सापडतात, कोब्रा , घोणस आणि नाग या प्रजाती मात्र तशा दुर्मिळ आहेत. अलीकडच्या काळात बीड जिल्ह्यात कोब्रा साप सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत, सर्प मित्रांनी पकडलेल्या 100 सापांपैकी 40 साप हे विषारी असल्याचे आढळते.
जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने आता साप मारून टाकणे हा प्रकार बंद झाला आहे. साप सापडला की सर्प मित्राला पाचारण केले जाते. त्यानंतर या सापांना जंगलात किंवा मोकळ्या रानात सोडले जाते. यामुळे सापांची संख्या वाढली आहे. असे सर्प मित्र अमित भगत, निलेश शृंगारे, आकाश निर्मल, अविनाश माने यांनी सांगितले आहे.
































































