
तब्बल पंधरा वर्षे वेगवेगळ्या टॉपच्या पदावर असताना अविनाश पाठकांचा थाट काही वेगळाच होता. त्यांनी बोलत राहायचं आणि समोरच्यांनी फक्त ऐकायचे. कायदा, कानून, नियम फक्त आपल्यालाच माहिती. या अर्विभावात बीड जिल्ह्यावर रूबाब गाजवला. मोठ्या नेत्याला हाताशी धरायचं. त्या नेत्याला दादा, दादा म्हणत राहायचं. विश्वास संपादन करायचा अन् त्या नेत्याच्या जीवावर पदे भोगायची. आज तो थाट आणि रूबाब अवघ्या काही क्षणात मातीत मिसळला. रात्रभर झोप नाही. झोपायला सतरंजी दिली. ज्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून रूबाब गाजवला. त्याच पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये सतरंजीवर रात्र काढावी लागली.
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बनावट आदेश जारी करून राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजात मोठा घोटाळा केला. या प्रकरणी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथील त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेतले. रात्री उशिरा अविनाश पाठक यांना बीड शहर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या गराड्यात आणण्यात आले. तपास अधिकार्यांनी रात्री त्यांची कसून चौकशी केली. अविनाश पाठक पहाटेपर्यंत जागेच होते. शहर पोलीस ठाण्यातच एका रूममध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था केली. झोपण्यासाठी खाली सतरंजी अंथरण्यात आली होती. ज्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून रूबाब गाजवला, थाटमाट केला, त्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अविनाश पाठक यांना सतरंजीवर रात्र काढावी लागली. डोक्यात चिंता आणि काळवटलेला चेहरा सगळं काही सांगून जातो. पंधरा वर्षे बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर काम करत असताना अविनाश पाठक यांनी सामान्य माणसाकडे कधी बघीतलेच नाही. दोन-चार लोकप्रतिनिधी हाताशी धरायचे, त्यांना दादा-दादा म्हणायचे, आपण त्यांच्या खूप विश्वासातले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि मी म्हणील तोच कायदा या अर्विभावात मग वागायचे. म्हणजे जिल्हा बँकेचे प्रशासक असताना बँकेसाठी त्यांनी काही केले नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जलजीवन योजनांचा घोटाळा बाहेर काढू शकले नाहीत. ते ज्या पदावर होते त्या पदाला त्यांनी कधी न्यायच दिला नाही. आज एका गुन्हेगारासारखे त्यांना वागावे लागत आहे.
अविनाश पाठकांना सात दिवसांची पोलीस कोठडी
बीड पोलिसांनी लातूरहून ताब्यात घेतलेल्या आयएएस अविनाश पाठक यांना रात्री शहर पोलीस ठाण्यामध्ये आणले. आज दुपारी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्यांना उभे करण्यात आले. भूसंपादन आणि मावेजा प्रकरणातील घोटाळ्याचा आवाका यात असणार्यांचा सहभाग या सर्व गोष्टींचा विचार करून अविनाश पाठक यांना सात पोलिसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. पोलीस कोठडी ठोठावताच शहर पोलिसांनी न्यायालयातून थेट शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणले गेले.






























































