अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या 429 टक्के इतका पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत  विमा कंपनीकडून तालुका स्तरावर नियुक्त केलेले कर्मचारी अपुरे असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज  स्वीकारण्याची प्रक्रिया गाव पातळीवरील कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, गाव पातळीवरील पिक विमा बाबत नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी व पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी यांची समिती सर्वेक्षण करून अहवाल सादर करणार असून अहवालाच्या आधारे पिक विमा नुकसानीचे माहिती जिल्हा प्रशासनामार्फत विमा कंपनीस देईल, असे त्यांनी सांगीतले. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत आधिसूचित क्षेत्रातील पीक कापणी करून सुकवण्यासाठी पसरवून ठेवलेल्या पिकांसाठी तसेच सततच्या पावसामुळे  बाधित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मोठी गर्दी होत आहे. विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांकही बंद असल्याने अडचणीचे ठरत आहे. यामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.

याच बरोबर राज्य शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई मदतीसाठीही पंचनामे करण्यात येणार असून त्याची माहिती राज्य शासनाला स्वतंत्ररित्या सादर केली जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टीसाठी मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा  लाभ मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी  करु नये व काळजी करू नये असे आवाहन पाण्डेय यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत सुकटे, प्रविण धरमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, शोभा ठाकूर यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.