
बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. सलग सहाव्या दिवशी एकीकडे बीड जिल्ह्याचा अहवाल निगेटिव्ह आलेला असताना उपचार घेणाऱ्या दोघा जणांनी कोरोनावर विजय मिळवला. आता केवळ 20 रूग्ण बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.
आज बीड जिल्ह्यातून 18 व्यक्तींचे थ्रोटचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 18 व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सलग सहाव्या दिवशी एकही रूग्ण बीड जिल्ह्यामध्ये आढळलेला नाही. एकीकडे रूग्ण आढळल्याचे प्रमाण शुन्यावर आले असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्त उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या आता घटत आहे. आगामी चार दिवसात बीड जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
आज दोन रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ 20 रूग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम असून तीन ते चार दिवसात सर्व रूग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकुण 111 कोरोनाग्रस्त रूग्ण सापडले. त्यापैकी 88 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले. आज दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तिघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर केवळ 20 रूग्ण उपचार घेत आहेत.



























































