बीड जिल्ह्यात 37 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून आज पाठवलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 643 वर गेली असून 302 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 341 एवढी आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये बीड शहरातील 16 सह बीड तालुक्यात 21, परळी तालुक्यातील 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1, इतके रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत बीड आणि परळी या दोन ठिकाणी अधिक रूग्ण संख्या असून त्यापाठोपाठ गेवराई, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, केज, धारूर या तालुक्यात बाधित रूग्णसंख्या आहे तर शिरूर आणि वडवणी या ठिकाणी रूग्णसंख्या कमी आहे. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी उपचार घेत असलेले रूग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामध्ये केवळ पाच रूग्ण गंभीर लक्षणे असलेली तर आठ रूग्ण हे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेली आहेत. यापैकी 13 रूग्ण बाहेर जिल्ह्यात उपचार घेत आहेत. नागरिकांनी या परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार आणि काळजी घ्यावी, प्रत्येक रूग्णालयात रूग्णांची योग्य काळजी घेतली जात असून पॉझिटिव्ह असल्याची भीती देखील मनात बाळगू नये, कुठलीही लक्षणे जाणवू लागल्यास लगेच तपासणी करून उपचार सुरू करावेत, आरोग्य प्रशासन याबाबतीत वारंवार सूचना करत आहे. कोरोनाची भीती मनातून काढून टाकावी, वेळेत उपचार मिळाले तर रूग्ण बरे होतात याचा अनुभव बरे झालेले रूग्ण घेत आहेत असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.