अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात 515 कोटींचे पीक नुकसान

737

ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसादरम्यान पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल विभागाने 11 तालुक्यातील जिरायत बागायत क्षेत्रावरील पिकांसह फळबागांचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. सोमवारी रात्रीपर्यंत सर्व पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 8 लाख 24 हजार 640 शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. पेरणी केलेल्या 8 लाख 12 हजार 252 हेक्टरपैकी 7 लाख 56 हजार 841 हेक्टरवरील शेत पिकांचे अतिवृष्टीमुळे 33 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टर 6 हजार 800 रूपये प्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे  514 कोटी 80 लाख रूपयांचे पीक नुकसान झाले आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दसऱ्यानंतर बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला. दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे, त्या पाण्यावर जगवलेली पिके अति पावसामुळे जमिनदोस्त झाली. जे काही उत्पन्न या पिकातून मिळणार होते तो मार्गही बंद झाला. अतिवृष्टीने झालेले नुकसान सहन न झाल्याने जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्यातील शेतकरी या नुकसानीमुळे खचून गेले. दरम्यान ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानंतर जिल्हा महसूल यंत्रणा कामाला लागली. तलाठ्यांनी गावोगावी जाऊन पंचनामे पूर्ण केले. त्याचा विस्तृत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार जिल्ह्यात 2 लाख 46 हजार 854 हेक्टरवरील सोयाबिनचे पीक अतिवृष्टीने बाधित झाले. याशिवाय 3 लाख 66 हजार 728 हेक्टरवरील कापूस, 6 हजार 665 मका, 63 हजार 823 हेक्टरवरील बाजरी, 7 हजार 505 हेक्टरवरील ज्वारी आणि 65 हजार 266 हेक्टरवरील इतर पिके असे एकूण 7 लाख 56 हजार 841 हेक्टरवरील शेत पिके अतिवृष्टीने जमिनदोस्त झाली. या पिकांना प्रति हेक्टर 6 हजार 800 रूपये प्रमाणे  नुकसान भरपाईसाठी 514 कोटी 65 लाख 18 हजार 800 रूपयांचा निधी आवश्यक आहे.

याशिवाय अतिवृष्टीने जिल्ह्यातील 85.3 हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 119 इतकी आहे. यात 10 हेक्टरवरील केळीच्या फळबागांचे नुकसान झाले असून 18.3 हेक्टरवरील द्राक्ष फळबागा बाधित झाल्या आहेत तर 57 हेक्टरवरील पपईच्या फळबागा अतिवृष्टी जमिनदोस्त केल्या. फळबागा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18 हजार रूपये प्रमाणे एकूण 15 लाख 35 हजार 400 रूपये इतका नुकसान भरपाई निधी आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.पाण्डेय यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या