बीड जिल्ह्यात प्रथमच पार पडणार तृतीयपंथीयाचा विवाह, किन्नर सपना बाळूसोबत अडकणार विवाहबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाचा विवाह होणार आहे. तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह सोमवार दि.7 मार्च रोजी सकाळी 11.35 वाजता श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर येथे होणार आहे. या विवाह सोहळ्याला देशातील पहिल्या विवाहीत तृतीयपंथी शिवलक्ष्मी संजय झाल्टे, त्यांचे पती संजय झाल्टे, शिवलक्ष्मी यांच्या सासू तसेच किन्नर आखाडाचे महाराष्ट्र व्यवस्थापन प्रमुख श्रीमंत ऋषिकेश महाराज उपस्थित राहणार आहेत.

बीड जिल्ह्यातच नव्हे किंबहुना मराठवाड्यामध्ये किन्नर असलेली सपना पहिल्यांदा सून म्हणून नांदायला जाणार आहे. किन्नर सपना आणि तिचा प्रेमवीर बाळू धुताडमल यांचे मागील दोन वर्षापासून प्रेम आहे. या प्रेमाचे रूपांतर सोमवार दि.7 मार्च रोजी सकाळी 11.35 वाजता प्रत्यक्ष विवाह बंधनात अडकणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किन्नर महिलांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.

लग्नाच्या पूर्वदिनी रविवार दि.6 मार्च रोजी नववधू किन्नर सपना आणि नवरदेव बाळू यांच्या हळदीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी नाळवंडी नाका, पेठ बीड भागात धार्मिक परंपरेनुसार होणार आहे. किन्नर सपना आणि बाळू यांच्या विवाहाला प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वतःहून उपस्थित राहत या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला ऐतिहासिक करावे असे आवाहन करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संध्या राजपूत यांच्यासह प्रीत कुकडेजा, शितल धोंडरे, शीतल राजपूत यांनी केले असून करणी सेनेच्या वतीने किन्नर सपना हिचे कन्यादान करण्यात येणार आहे.