
बीडमधील नगर पालिकेतील विरोधकांकडून निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी आज नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश करतांना आपल्या वॉर्डाच्या विकासासाठी आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत असल्याचे म्हटले.
बीड नगर पालिकेतील काकू नाना आघाडी मधून विजय मिळवलेल्या प्रभाकर पोकळ, गणेश तांदळे, रणजित बनसोडे, भैय्या साहेब मोरे, या चार नगरसेवकांनी आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ .भारत भूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. चार नगरसेवकाच्या प्रवेशाने शिवसेनेची नगरपालिकेत मोठी ताकद वाढली आहे.
या आधीही काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम्ही काकू नाना आघाडीतून निवडून आलो. पण आम्ही आमच्या भागाचा विकास या चार वर्षांत करू शकलो नाहीत. उर्वरित एक वर्षात तरी वार्डाचा विकास करता यावे, या उद्देशाने आज आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. आम्ही विरोधी बाकावर असूनही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी आमच्या भागातील विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, अशी भावना शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
या वेळी डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, विलासराव बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, जगदीश काळे, गणपत दोहींफोडे उपस्थित होते.




























































