
बीड जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रिया पूर्ण झाली. या पदाचा निकाल 13 जानेवारी रोजी लागणार असला तरी भाजपच्या हातातून बीडचे जिल्हापरिषद निसटण्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादीमध्ये बिग फाईट अन चुरस होईल असे बोलले जात होते मात्र ना चुरस ना फाईट, राष्ट्रवादीला ओव्हरफ्लो मताधिक्य मिळेल असा दावा केला जात आहे.
बीड जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात होती. ती खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने फिल्डिंग लावली होती. धनंजय मुंडे सत्ता परिवर्तनासाठी जातीने लक्ष घालून होते. त्याचा परिपाक आजच्या निवडीत दिसून आला. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान झाले. 60 सदस्य असलेल्या जिल्हापरिषदेच्या 53 सदस्यांनी आपला हक्क बजावला, दोन सदस्य आमदार झाले आहेत तर पाच सदस्य अपात्र आहेत. निवड चुरशीच्या होतील असा राजकिय कयास होता, मात्र निवडीची केवळ औपचारिकता पूर्ण झाली. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कडून शिवकन्या सिरसाट तर भाजपाकडून योगिनी थोरात यांनी अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कडून बजरंग सोनवणे, भाजपकडून भारत काळे यांनी निवडणूक लढवली, धनंजय मुंडे बीडमध्ये तळ ठोकून होते. तर पंकजा मुंडे देशाबाहेर असल्याने प्रीतम मुंडे बीड मध्ये दाखल झाल्या होत्या. या निवडीचा निकाल न्यायालयाच्या सुनावणी नंतर म्हणजे 13 जानेवारी रोजी समोर येणार आहे.




























































