
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तार चोरीच्या प्रयत्नात एक हायव्होल्टेज टॉवर कोसळल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत दोन चोरट्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह लपवण्यासाठी त्यांच्या साथीदारांनी रस्ते अपघाताचा बनाव रचला, मात्र परभणीत नेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून पाच ते सात जणांची टोळी केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात तार चोरी करण्यासाठी आली होती. शनिवारी रात्री उशिरा अविनाश पाटोळे आणि आकाश आडे हे दोघे हायव्होल्टेज टॉवरवर चढले आणि विजेच्या तारा कापण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र अचानक हा महाकाय टॉवर कोसळला. या भीषण अपघातात अविनाश आणि आकाश या दोघांचा टॉवरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
या चोरीच्या मोहिमेत मृत दोघांसह आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत असे एकूण पाच जण सहभागी होते. टॉवर कोसळल्यानंतर इतर तिन्ही साथीदारांची मोठी धांदल उडाली. पोलिसांच्या भीतीने त्यांनी या मृत्यूला रस्ते अपघात दर्शवण्याचे ठरवले.
घटनेनंतर साथीदारांनी दोन्ही मृतदेह एका कारमध्ये टाकले आणि थेट परभणीच्या दिशेने धाव घेतली. परभणीला पोहोचल्यानंतर भीतीपोटी इतर साथीदारांनी मृतदेह गाडीतच सोडून तिथून पळ काढला. त्यानंतर कार चालकाने रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान नातेवाईकांना माहिती मिळताच आणि मृतदेहांची अवस्था पाहता संशय बळावला. चौकशीअंती टॉवर कोसळून मृत्यू झाल्याचा आणि चोरीचा हा गंभीर प्रकार समोर आला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परभणी आणि केज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. विजेच्या तारांच्या चोरीसाठी चक्क अख्खा टॉवरच धोक्यात घालण्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
























































