
>> उदय जोशी
घरात दोन दिवस पाणी असेल तर पाच हजार रुपये मिळतील, अशा रझाकारी अटीशर्ती घालून मदत देण्याचे नाटक करणार्या फडणवीस सरकारला लाज वाटावी, अशी घटना बीड येथे घडली आहे. येथील जिव्हाळा केंद्रात राहणार्या जवळपास ५० अनाथांनी एका पूरग्रस्त कुटुंबाचा संसार पुन्हा उभा केला. कुणी भीक मागून पैसे दिले, कुणी धुणीभांडी करून आलेला पैसा दिला, कुणी कनवटीला बांधून ठेवलेले पैसे दिले… मुलांच्या दप्तरापासून ते घरातील भांड्याकुंड्यांपर्यंत… सगळे काही… जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे… याची प्रचिती देणारा हा प्रसंग!
गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यावर आभाळच कोसळले. बीडकरांनी कधीही बघितला नाही असा महाभयंकर पाऊस कोसळला. नद्या, नाले, तलाव, धरणांत पाणी मावेनासे झाले. पाण्याचा भार सहन न झाल्यामुळे सिंदफणा नदी बेभान झाली. वाटेत येणारे पोटात घेत सिंदफणा वाट फुटेल तिकडे धावत सुटली. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा असा कोणताही भेद तिच्या ठायी नव्हता. हिंगणी हवेली या चिमुकल्या गावात सिंदफणाने असाच हाहाकार उडवला. दीड एकराचे मालक असलेल्या सरवदे कुटुंबाची प्रलंयकारी पुराने दाणादाण उडवली. रमेश सरवदे त्यांच्या पत्नी सुनीता यांच्यासह कुटुंबात नऊ जण. महापुराने सरवदे यांचा संसारच वाहून नेला. घरात काहीच उरले नाही, मागे राहिला तो पुराचा कुबट वास. अंगावरचे कपडे तेवढे वाचले. तब्बल ३६ तासांनंतर सरवदे कुटुंबाला पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जीव वाचला पण संसार वाचला नाही. काय करायचे, कसे करायचे, अशा जगण्याच्या विवंचनेत सरवदे कुटुंब सापडले. पंचनामा कधी होणार, सरकारी मदत कधी मिळणार, अशा प्रश्नांच्या भूलभूलैय्यात सापडलेल्या सरवदे कुटुंबाला जगण्याची उमेद मिळाली, जिव्हाळ्याच्या माणसांकडून!
‘जिव्हाळा’ केंद्रातील अनाथांचे आभाळाएवढे मन
बीड शहरात अनाथांचा आधार असलेले जिव्हाळा केंद्र आहे. कोरोना काळात हे केंद्र सुरू झाले. सुरुवातीला नगर परिषदेने या केंद्राचा भार उचलला. आता समाजातील दानशुरांच्या मदतीवर हे केंद्र अवलंबून आहे. या केंद्रात जवळपास ५० अनाथ एकमेकांच्या आधाराने राहतात. त्यातील काही जण भीक मागतात, काही जण जमेल तेवढे काम करतात, काही महिला धुणीभांडी करतात. समाजातील काही प्रतिष्ठित जमेल तेवढी मदत करतात. कुणाचा वाढदिवस असेल तर जिव्हाळा केंद्रात जेवण दिले जाते, त्यासोबतच काही पैसेही दिले जातात. ज्या दिवशी कुणाचा वाढदिवस नसेल त्यादिवशी हॉटेलातील उरलेले अन्न या अनाथांची भूक भागवते. सरवदे कुटुंबाची पुराने झालेली वाताहत कानावर पडल्यानंतर या अनाथांच्या मनात कालवाकालव झाली. प्रत्येकाने कधीतरी कामी येतील म्हणून ठेवलेले संचित बाहेर काढले. बघता बघता २० हजार रुपये जमा झाले.
फाटक्या नोटा, चिल्लर…
अनेकांकडे भिकेत मिळालेल्या फाटक्या नोटा, चिल्लर होती. ती देखील त्यांनी दिली. जिव्हाळा केंद्राचे संचालक राजू वंजारे यांनी त्यातील फाटक्या नोटा बाजूला काढल्या. चिल्लरच्या नोटा करून घेतल्या. फाटक्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न होता. तो काही दात्यांनी सोडवला. फाटक्या नोटा घेऊन त्याबदल्यात त्यांनी चांगल्या नोटा तर दिल्याच, पण त्यात भरही घातली. चांगले ३६ हजार रुपये गोळा झाले. त्यातून संसारोपयोगी साहित्य, लहान मुलांचे दप्तर, वह्या पुस्तके आणली.

सरवदे कुटुंबाच्या डोळ्याचा चार चार धारा
जिव्हाळा परिवाराने सरवदे कुटुंबाला बोलावले. काहीतरी मदत मिळेल तेवढाचा आधार, असे रमेश सरवदे यांना वाटले. परंतु, समोर सगळा संसार पाहून त्यांच्या डोळ्यातून ‘सिंदफणा’च वाहू लागली. डाळ, तांदळापासून ते बादली, साबणेपर्यंत सगळा संसारच समोर होता. अगदी आठवण ठेवून लहान मुलांचे दप्तर, वह्या, पुस्तकेही समोर होती. शिवाय घरातील पुरुषांना कपडे, महिलांना साड्याही आणल्या होत्या. दातृत्वाची ही पराकाष्ठा पाहून सरवदे कुटुंब हेलावून गेले. आमचे सर्वस्वच पुरात वाहून गेले, पण पुन्हा नव्याने हा संसार पाहून आमच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण केली, अशीच भावना रमेश सरवदे यांनी व्यक्त केली.
जिव्हाळा केंद्रातील लोकांसोबत बोलताना सरवदे कुटुंबाच्या झालेल्या वाताहतीचा विषय निघाला. ऐन सणावारात अशी आपदा आली. या संकटकाळात आपणही काही मदत केली पाहिजे, असे अनेकांनी बोलून दाखवले. नुसते बोलून नाही तर प्रत्येकाने त्यांच्या कनवटीला असलेले पैसे पटापट काढून दिले. दातृत्वाची ही भावना पाहून समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे हे पटले.
राजू वंजारे, जिव्हाळा केंद्रचालक
जिव्हाळा केंद्रातील अनाथांनी जमा केलेले २० हजार रुपये माझ्याकडे देण्यात आले. त्यात दहा, वीस, पन्नासच्या बर्याच फाटक्या नोटा होत्या. त्या आम्ही वेगळ्या केल्या, त्या नोटा आमच्याकडे ठेवून घेतल्या आणि त्याबदल्यात चांगल्या नोटा दिल्या. एवढ्या पैशात संसार कसा उभा राहणार, हे लक्षात आल्यानंतर आम्ही काही जणांनी त्यात पुन्हा भर घातली. संकटकाळात माणूस माणसाची मदत नाही तर कोण करणार?
राजाभाऊ गुळभिले



























































