
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले होते. सकाळचे कार्यक्रम आटोपून अजित पवार यांचा ताफा पोलीस ग्राऊंडकडे निघाला होता. तिथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. अजित पवार यांचा ताफा नगर नाका परिसरात येताच दोन तरुणांनी त्यांच्या ताफ्यासमोर धाव घेतली आणि अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
भरधाव ताफ्यासमोर दोन तरुणांनी घोषणाबाजी करत अचानक धाव घेतल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. हे दोन्ही तरुण केज तालुक्यातील असल्याची माहिती मिळत असून त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही कार्यवाही न झाल्याने त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे कळते. या बाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.