भाजपच्या फसव्या कर्जमाफीने घेतला बळी!

419

अगोदर कोरडा दुष्काळ, त्यानंतर आलेल्या भयंकर ओल्या दुष्काळाने हिरावून नेलेले सर्वस्व आणि भाजप सरकारच्या फसव्या कर्जमाफीने मराठवाड्यात चार शेतकऱ्यांचा बळी घेतला. बीड जिल्ह्यात दोन तर हिंगोली जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

गेल्या चार वर्षांपासून शेतकरी कोरड्या दुष्काळाशी झुंजत होता. आता ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. भाजप सरकारने कर्जमाफी केली. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी खडवूही पडला नाही. उलट कर्जाचा डोंगर वाढतच गेला आणि बँकांच्या सावकारी वसुलीने शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे.

मंगळवारी बीड जिल्ह्यातील वाहेगार आमला येथे रामनारायण खेत्रे (42) या शेतकऱ्याने शेतात गोठ्यामध्ये आढ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. खेत्रे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून शेतीसाठी काही महिन्यांपूर्वी कर्ज घेतले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने त्यांचे शेत धुवून नेले. कर्ज कसे फेडावे या चिंतेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येची दुसरी घटना बीड तालुक्यात कुकडगाव येथे घडली. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून अरुण मारोती शिंदे (30) यांनी विष घेतले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

हिंगोली जिल्ह्यात केलसुला येथे संजय पिराजी चव्हाण (40) यांनी शेतीसाठी तीन वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. व्याजासह ती रक्कम आता 57 हजार रुपये झाली आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडून तगादा लावण्यात येत आहे.  कधी कोरडा, कधी ओल्या दुष्काळामुळे ते वैतागून गेले होते. त्यातच बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावल्याने संजय चव्हाण हे तणावात होते. याच नैराश्यात त्यांनी शेतात गळफास घेतला. त्यांच्या पश्चात  आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. औंढा नागनाथ तालुक्यात वाळकी येथे संभाजी कुकडे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्यावर खासगी व अन्य बँकांचे कर्ज आहे. पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या