
बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्यरात्री पासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू होत. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांच्या गर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी मध्यरात्री पासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक नद्यांना पुन्हा पूर आला असून रस्ते, मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बिंदुसरा नदी तुडुंब भरून वाहत आहे. मांजरा, माजलगाव, सिंध्फणा प्रकल्पातून पुन्हा विसर्ग वाढवला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचू लागले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरी संतत धार सुरू आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका, बिंदुसरा, सिंदफना, मांजरा, नद्यांना पूर आला असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
दरम्यान, आता मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मांजरा, माजलगाव, प्रकल्पातून विसर्ग सुरू केला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धारूर तालुक्यातील गांवदरा गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल सततच्या मुसळधार पावसाने वाहून गेल्याने अर्ध्या गावाचा संपर्क तुटला आहे.
बीडमध्ये 18 महसूल मंडलात अतिवृष्टी
बीड जिल्ह्यातील तब्बल अठरा महसूल मंडलात रात्री अतिवृष्टी झाली आहे. यात बीड तालुक्यातील बीड 73.8 मीमी, पाली 82.3, पेंडगाव 73.8, मांजरसुंबा 66.3, पाटोदा तालुक्यातील पाटोदा 71.5, दासखेड 86.0, थेरला 114.5, माजलगाव तालुक्यातील नित्रुड 70.0, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर 84.3, उजनी 73.8, केज तालुक्यातील केज 74.3, हनुमंत पिंपरी 77.3, होळ 77.5, परळी तालुक्यातील परळी 68.8, धर्मपुरी 73.8, नागापूर 73.0, धारूर तालुक्यातील धारूर 84.3, तेलगाव 85.0 मीमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.