
सामना प्रतिनिधी। बीड
आपल्या शेतातून रहदारी करण्यास शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची ही अडचण दूर होण्याच्या दृष्टीने संपूर्ण मराठवाड्यातील गावागावात आणि प्रत्येक शेतात असणारे पांदण रस्ते पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करत आहोत. 28 नवीन कृषी कामे आहेत. त्या कामाचा लाभही प्रत्येक गावाने घेतला पाहिजे आता ठिंबक सिंचनासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तातडीने तो शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. असा विश्वास शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील रायमोहा येथे दिला.
रायमोहा येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांशी ते संवाद साधत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मागेल त्याला शेततळे ही योजना अधिक प्रभाविपणे राबवली जाणार आहे. त्यात 95 हजार रूपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. ‘ठिंबक सिंचनासाठी तातडीने पैसा उपलब्ध करून दिला जाणार आहे. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ व्हावा यासाठी आपण जातीने लक्ष घालत आहोत. 28 नवीन कामे आहेत. त्या कामाचा प्रत्येक गावपातळीवर लाभ झाला पाहिजे. मराठवाड्यातील पांदण रस्ते हे आपले स्वप्न आहे आणि त्यासाठी आर्थिक तरतूद करून घेतली जात आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, गोरगरिबांसाठींचे 600 रूपयाच्या अनुदानात वाढ झाली आहे. निराधारांना आता एक हजार रूपयाचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे ही सामाजिक समस्या नष्ट होणार आहे. युती सरकार समाजहिताचे दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत आहे. सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडल्याने मराठा आरक्षण मार्गी लागले आहे असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले. यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






























































