‘रत्नसुंदर’ सीताफळे दिल्ली, कोलकत्याला रवाना; पावसाचा फटका बसूनही विक्रमी उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्याच्या मध्यम प्रतीच्या जमिनीत फुलवलेल्या सीताफळाच्या बागेने शेतकऱ्याची मानसिकताच बदलून टाकली आहे. म्हणूनच फळबाग लागवड वाढत आहे. थंडी पडताच गोड असणाऱ्या सीताफळाचा पहिला टप्पा दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्याकडे रवाना झाला 105 रुपये किलोचा भाव पदरात टाकून सीताफळे मेट्रो सिटीत पोहोचली असून खवय्यांना भुरळ घालत आहे. ‘रत्नसुंदर’ सीताफळाचे यंदा 120 टन उत्पादन निघण्याची शक्यता असल्याचे उत्पादक धर्यशील सोळुंके यांनी सांगितले

बीड जिल्ह्यातील धर्यशील सोळुंके या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक आणि नगदी पिकांना फाटा देत सीताफळाची बाग उभारली. सोळुंके यांनी 10 एकरवर गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केली. स्वतः कृषी पदवी धारक असणारे धर्यशील सोळुंके यांनी परिश्रम पूर्वक 3 वर्ष बाग जोपासली आणि या परिश्रमाला अखेर फळ लागले. गत वर्षी पुणे, मुंबई, दिल्लीच्या बाजारात व्यापाराच्या माध्यमातून मोठा नफा पदरात पाडून घेतल्यानंतर यंदा सीताफळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्याच्या बाजारात विक्री साठी पाठवले. अवीट गोडीने दिल्ली, कोलकात्यात भुरळ पाडणाऱ्या बीडच्या सिताफळाने फळांच्या बाजारात दबंगगिरी दाखवली. किलो मागे तब्बल 105 रु चा भाव मिळाला आहे.

sugar-apple1

या हंगामात 120 टन सीताफळाची उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संपूर्ण खर्च जाता तब्बल दीड ते पावणे दोन कोटी रु निव्वळ नफा पदरात पडणार आहे. हा मिळणारा नफा इतर कोणत्याही पिकापेक्षा अव्वल ठरला आहे. ही फायद्याची शेती डोळ्यासमोर ठेऊन अजून 28 एकरात सीताफळ लागवड करण्यात आली आहे.