450 वर्ष जुनी विहीर,100 वर्ष जुने धरण आटले; बीडमध्ये उरला फक्त 0.72 टक्के पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. मराठवाडा पाण्याअभावी अक्षरश: होरपळतोय. बीड जिल्ह्याती परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली असून इथल्या 1300 गावामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झगडावे लागत आहे. टँकर गावात आले की जी जीवघेणी धावपळ सुरू होते ती पाहिल्यानंतर ही वेळ शत्रूवरही येऊ नये हे वाक्य मनामध्ये सतत उमटत राहतं.

beed-water-tanker

बीड जिल्ह्यात सध्या फक्त 0.72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चिंता वाढवणारी बाब ही आहे की 20 हजार हातपंप, 48 हजार विंधन विहिरी, 12,000 आडे, 7,000 विहिरी आटले आहेत. 144 मध्यम आणि लघु प्रकल्पापैकी 93 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. मोठ्या प्रकल्पामधील पाणीसाठा जोत्याच्या खाली आहे. इथल्या जुन्या जाणत्या मंडळींच्या मते सध्याची परिस्थिती ही 1972 च्या दुष्काळापेक्षाही भयानक आहे.

khajana-well

इथल्या नागरिकांचा दिवस सुरू होतो तोच पाणी कुठून आणि कसं आणायचं या प्रश्नापासून. धरणाला लागून असलेल्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. जिल्ह्याची संपूर्ण मदार फक्त आणि फक्त टँकरवर आहे. बीड जिल्ह्यात 144 मध्यम प्रकल्प तर 93 लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत, 16 प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. अप्पर कुंडलिका हा एकमेव प्रकल्प आहे ज्यात 42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव आणि मांजरा या प्रकल्पातील पाणी जोत्याच्या खाली आल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे.

mamla-dam

बीड जिल्ह्यातील 890 बंधाऱ्यांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही. नळ योजना बंद पडल्यानंतर सगळी भिस्त ही हातपंप, विंधनविहिरी, आड यांवर असते. मात्र यावर्षी हे सगळे मार्ग बंद झाले आहेत, कारण ते देखील कोरडे पडले आहेत. पाणी संकटामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनही हतबल झाले आहे. उपाययोजना कमी पडत आहेत. टँकर भरून आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळेल ते पाणी देण्याच्या प्रयत्नात टँकरद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. पाऊस वेळेवर न झाल्यास बीड जिल्ह्याची परिस्थिती यापेक्षाही भयावह होणार आहे. पाण्यासाठी वाडा, वस्ती, गावे ओस पडणार आहेत. शहराचेही स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनासाठी संपूर्ण जिल्हाच ‘वॉररूम’
बीड जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठीच्या उपाययोजना राबवण्यासाठी धाडसी निर्णय घेतले जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पाण्डेय जातीने दुष्काळी उपाययोजना राबवण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांना पाणी मिळावं यासाठी 890 टँकर दिवसरात्र खेपा मारत आहेत. 947 विहिरींचे, बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. 13 गावामध्ये तात्पुरती पूरक नळ योजना सुरू केली आहे तर 17 गावामध्ये विशेष नळ योजना सुरू केली आहे.

खजाना विहिरीचा खजाना आटला
साडेचारशे वर्षाचा इतिहास असणारी खजाना विहिर आतापर्यंत फक्त तीन वेळा कोरडीठाक पडली आहे. यावर्षी मार्च महिन्यातच खजिना विहीर पूर्णपणे आटली आहे. या विहिरीमुळे बीड शहरालगतची 200 हेक्टरची जमीन सिंचनाखाली आली होती.खजाना विहिरीप्रमाणेच वडवणी शहराजवळ असणारे 100 वर्ष जुने मामला धरण पूर्णपणे आटले आहे.