
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहार सरकारने दारुबंदी लागू केल्यानंतर जप्त केलेल्या दारुमधील तब्बल 100 लीटर बियरच्या बाटल्या गायब झाल्याचं समोर येत आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून पोलिसांनी याबाबत उंदरांवर संशय व्यक्त केला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 2016पासून बिहारमध्ये दारूबंदी लागू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी धाड घालून जप्त केलेली दारू एका गोदामात ठेवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हे गोदाम उघडण्यात आलं तेव्हा त्यात अनेक कॅन्स आणि बाटल्या रिकाम्या असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदामातील अनेक कॅन्स हे कुरतडल्याप्रमाणे फोडले गेले आहेत. काही बाटल्या गायब आहेत. कॅन्सवर अनेक छिद्रं आहेत. त्यामुळे गोदामाच्या आसपास वावरणाऱ्या उंदरांनी हे काम केलं असावं, असा पोलिसांचा संशय आहे.
तर एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या गोदामातील दारू पोलिसांनी स्वतः सेवन केली आहे किंवा मग विकली आहे. पण, कारवाईपासून वाचण्यासाठी ते आता उंदरांवर आरोप करत आहेत, असं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. अर्थात दारूच्या गोदामातून दारू गायब होण्याची ही पहिलीच वेळ नसून गेल्या वर्षी लखनौ येथे जप्त केलेली नऊ लाख लीटर दारू देखील तथाकथित उंदरांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली होती.
summary-beer cans got missing police suspect on mice

























































