दारू चढल्यावर अनाकर्षक व्यक्तीही आकर्षक वाटायला लागतात, संशोधकांचा दावा

587

दारू चढली की माणसाला कोणतीही व्यक्ती आवडायला लागते असा दावा काही संशोधकांनी एका संशोधनाद्वारे केला आहे. ‘बिअर गॉगल्स इफेक्ट’ नावाची एक संकल्पना आहे. ज्यात बिअरच्या काही बाटल्या आकर्षक व्यक्ती आणखी आकर्षक वाटायला लागतात असं म्हटलं जातं. ही संकल्पना खरी आहे आणि यात एक पाऊल पुढे जात अनाकर्षक व्यक्तीही आकर्षक वाटायला लागतात हे सिद्ध करण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं.

Psychology of Addictive Behaviours नावाच्या एका जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. संशोधकांनी कॉम्प्युटरचा आधार घेत निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. संशोधकांनी अभ्यासासाठी इंग्लंडमधील ओर्मस्कर्क विदयापीठाच्या परिसरातील पब आणि बारमध्ये जाणाऱ्यांचा अभ्यास केला. शुद्धीत असताना आणि दारू प्यायल्यानंतर त्यांना संशोधकांनी काही फोटो दाखवले. फोटो पाहून कोणत्या व्यक्ती आककर्षक वाटतात आणि कोणत्या अनाकर्षक वाटतात असा प्रश्न विचारण्यात आला.

जवळपास 120 जणांना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आलं होतं. यातील जवळपास सगळ्यांनी शुद्धीत असताना आकर्षक चेहऱ्यांना पसंती दर्शवली होती. दारू चढल्यावर मात्र त्यांना आकर्षक चेहऱ्यांइतकेच अनाकर्षक चेहरेही आवडायला लागले होते असं दिसून आलं आहे. या संशोधामुळे बिअर गॉगल्स ची ऐकीव संकल्पना ही खरी असल्याचं सिद्ध झाल्याचं एज हिल विद्यापीठाचे प्राध्यापक डेरेक हाईम यांनी म्हटलं आहेय

संशोधनात सहभागी झालेल्यांना दारू थोडी चढल्यावर सहभागी करून घेण्यात आलं होतं. दारू पिऊन तर्राट झालेल्यांना यात सहभागी करण्यात आलं नव्हतं. यापूर्वीही या संकल्पनेवर संशोधन झालं होतं. मात्र त्या संशोधनातील तथ्ये असमान होती. यामध्ये दारू प्यायलेल्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला होता की इतर जण तुम्हाला आकर्षक वाटतात की नाही. नव्या संशोधनात अप्रत्यक्ष पद्धत वापरण्यात आली होती असं या संशोनात सहभागी झालेल्या रेबेका माँक या संशोधिकेने सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या