खर्डीतील खड्डेमुक्त रस्त्यासाठी दिव्यांग बांधवांचे आज ‘भीक मांगो’

निधी अभावी शहापूर-सापगाव-मुरबाड रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी गुरुवारी भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाला निधीसाठी
मदत उपलब्ध करून देण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.

शहापूर – सापगाव रस्ता एमएसआरडीसी अंतर्गत असून प्रशासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याचा चिखल झाला आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पैशांची अडचण भासत असेल तर हातात लोटा घेऊन भीक मांगो आंदोलन करून पैशांची मदत करण्याचा इशारा एकल व्य दिव्यांग फाऊंडेशनने निवेदनाद्वारे तहसील दार, पोलीस निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.