
मुंबई महानगर पालिकेच्या एच-पूर्व विभागातील बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थरनगरसारख्या दाटीवाटीच्या वस्त्यांवर सध्या ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त माध्यमातून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या परिसरात 184 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून रमजान सुरू झाला असला तरी घरात राहूनच रमजान साजरा करावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पालिकेच्या एच-पूर्व विभागात दाटीवाटीने वसलेल्या झोपड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रसारही वाढला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली आहे. त्यामुळे या विभागातील कंटेनमेंट झोनमध्ये गर्दी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळेच पालिकेने या भागात पोलिसांच्या मदतीने ‘ड्रोन’ कॅमेर्यायच्या सहाय्याने येथील नागरिकांवर लक्ष ठेवायला सुरुवात करण्यात आली आहे. 25 एप्रिलपासून सुरू झालेल्या पवित्र रमजान उपवासादरम्यान नागरिकांनी घरात राहूनच कोरोना संकटाशी मुकाबला करावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पालिकेने केले आहे. दरम्यान, पालिका आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या या कार्यवाहीबाबत संबंधित परिसरातील नागरिक पालिका आणि पोलिसांचे आभार व्यक्त करीत आहेत.
जनजागृतीही जोरात
पालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून संबंधित भागातील वस्त्यांमधून लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी उद्घोषणा करून लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. सावध करण्यात येत आहे. यामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी एच पूर्व विभागातील महानगरपालिकेचे अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ‘ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया’ चे प्रतिनिधी यांच्या सहभागाने कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये नियम मोडणार्यांशवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


























































