
बेळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘जनसेवक मेळाव्या’ला विनाशर्त परवानगी देणाऱ्या कर्नाटक प्रशासनाने यंदा कोरोनाचे कारण देत सीमालढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कानडी सरकारची ही दडपशाही झुगारून मराठी भाषिकांनी कंग्राळी, निपाणी, खानापूर, बेळगावसह सीमाभागात ठिकठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणा देत हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचा निर्धार सीमाबांधवांनी व्यक्त केला.
भाषावार प्रांतरचनेत 17 जानेवारी 1956 रोजी 25 लाख लोकांचा मराठी भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्याची घोषणा केली होती. याविरोधात बेळगावमध्ये निघालेल्या मूक फेरीवर कानडी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यात पै. मारुती बेन्नाळकर, मधुकर बांदेकर, महादेव बारीगडी, कमळाबाई मोहिते, गोपाळ चौगुले, बाळू निजकर, नागाप्पा होसूरकर, लक्ष्मण गावडे हे हुतात्मा झाले. दरवर्षी 17 जानेवारीला या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, तसेच मराठी भाषिकांच्या उपस्थितीत आज कंग्राळी खुर्द आणि हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा आणि सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोडमार्गे पुन्हा हुतात्मा चौक अशा मार्गावरून अभिवादन फेरी काढण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कर्नाटक सरकारच्या अत्याचारांचा पाढा वाचत ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हा निर्धार आजही कायम असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेतेमंडळी केंद्रीय गृहमंत्रिपदावर विराजमान झाली. मात्र, ‘आधी देश, मग राज्य’ या भावनेमुळेच सीमाप्रश्नी अद्यापि म्हणावा तसा फरक पडलेला नाही, असे दळवी म्हणाले. यावेळी किरण ठाकुर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































