
मराठी द्वेषाने पछाडलेल्या बेळगाव महापालिकेने शुक्रवारी पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शहीद भगतसिंग चौकातील मराठी फलक रातोरात जबरदस्तीने हटविला. 60 टक्के कन्नड सक्तीचा आदेश केवळ दुकानांपुरता असतानाही महापालिकेने मंडळाच्या फलकावरही कन्नड सक्ती केल्याने गणेशभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.
शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या आगमन सोहळय़ाचा मराठी भाषेतील फलक उभारला होता, पण हा फलक मराठीत असल्याने महापालिकेने हटवला. दुकानांना लागू असलेला नियम धार्मिक कार्यक्रमांना का लावण्यात येत आहे, असा जाब मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारला असता, आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगून त्यांनी काढता पाय घेतला. मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, महापालिकेच्या मनमानी कारवाईचा निषेध केला.