
सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतरही वठणीवर न आलेल्या मोदी सरकारविरोधात रविवारी बेळगावात शेतकऱ्य़ांच्या संतापाचा उद्रेक झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमावेळी संतप्त शेतकऱ्य़ांनी जाचक कृषी कायद्यांच्या निषेधार्थ लोटांगण आंदोलन केले. या वेळी कृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत, अशी घोषणा देताना शेतकऱ्य़ांनी ‘अमित शहा गो बॅक’चेही नारे लगावले.
कृषी कायद्यांविरोधात देशभर संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्य़ाला स्थानिक शेतकऱ्य़ांनी आधीपासूनच कडाडून विरोध केला होता. मात्र या विरोधाला न जुमानता शहा यांनी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवून दौऱ्य़ाचे नियोजन ‘जैसे थे’ ठेवले. त्यांचा कार्यक्रम सुरू होण्याआधी शेतकऱ्य़ांनी रविवारी सकाळी राणी चन्नम्मा चौकात लोटांगण आंदोलन सुरू केले. शहा यांचा कार्यक्रम असलेल्या निराणी साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्य़ांनी धरणे धरली.
यावेळी शेतकऱ्य़ांच्या हक्कांवर नांगर फिरवणारे कृषी कायदे तातडीने मागे घ्या, अमित शहा गो बॅक अशा विविध घोषणा देत आंदोलक शेतकऱ्य़ांनी परिसर दणाणून सोडला.
कर्नाटक पोलिसांची मुजोरी; आंदोलकांना फरफटत नेले
गृहमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या गाड्यांचा ताफा निराणी साखर कारखान्याच्या दिशेने वळताच कर्नाटक पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्य़ांना ताब्यात घेतले. काही शेतकरी जागेवर उठण्यास तयार नव्हते. पोलिसांनी त्यांना फरफटत बाजूला नेले. पोलिसांच्या या मुजोरीचा शेतकऱ्य़ांनी तीव्र निषेध केला.



























































