इंग्लंडला मिळाला नवा कर्णधार, रूटनंतर ‘या’ खेळाडूकडे टेस्ट टीमची धूरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडच्या कसोटी संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. अॅशेस मालिकेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर जो रूट याने कर्णधारपद सोडले होते. आता त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडे इंग्लंडच्या टेस्ट टीमची धूरा सोपवण्यात आली आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाच्या फलंदाजीचा कणा समजला जाणारा कर्णधार जो रूट याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. रूटने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाचे कर्णधारपद द्यायचे कोणाकडे? असा प्रश्न इंग्लंड क्रिकेट बोर्डापुढे निर्माण झाला होता. ऍशेस मालिकेतील पराभव आणि त्यानंतरच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडचा पराभव मनाला लागल्याने रूटने संघ नेतृत्व सोडले होते. मात्र आता इंग्लंड क्रिकेट संघाने बेन स्टोक्स याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

ठेवली होती मोठी अट

इंग्लंड संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी बेन स्टोक्स याने एक अट ठेवली होती. स्टोक्सला जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोघे संघात हवे आहेत. वाढत्या वयामुळे दोघांनाही संघातून डच्चू देण्यात आला होता. त्याची ही अटही मान्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.

बेन स्टोक्सची कामगिरी

बेन स्टोक्स याने इंग्लंडकडून आतापर्यंत 79 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 146 डावात फलंदाजी करताना 5061 धावा केल्या आहेत. 258 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून यात त्याच्या 11 शतकांचा आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीमध्ये त्याने 174 बळीही घेतले असून 22 धावांवर 6 बळी ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे.