वंग दुर्गापूजा ऑनलाईन

>> शिबानी जोशी

मराठमोळय़ा मुंबईत देवीची सगळीच रूपं एकवटलेली. महिषासूरमर्दिनी वंगरूपात अवतरते आणि समस्त मराठी मनास मोहवत राहते. पण यंदाची ही दुर्गापूजा शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करते आहे.

महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे गणपती उत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणेच बंगालमध्ये दुर्गापूजेचं महत्त्व आहे. बंगाली लोकांचा सर्वात मोठा आवडता हा नवरात्रीतील उत्सव आहे. मुंबईत, महाराष्ट्रात विविध ठिकाणी इतर राज्यांतून लोक आले व स्थायिक झाले तसेच पश्चिम बंगालमधूनही आले व स्थायिक झाले.

माणूस हा समाजप्रिय आहे. समविचारी लोकांना एकत्र यायला नेहमीच आवडते. तसेच या पश्चिम बंगालपासून इतक्या दूर आलेल्या बंगाली लोकांनी एकत्र येऊन मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे बेंगाल क्लबची जवळ जवळ 100 वर्षांपूर्वी स्थापना केली. गुजराती किंवा इतर राज्यांतील लोकांइतकी त्यांची मुंबईत संख्या दिसत नाही. तरीही बंगाली भाषा शिकवणे, रवींद्र संगीत शिकवणे, फुटबॉल असे खास बंगाली उपक्रम करत असतानाच 85 वर्षांपूर्वी दुर्गापूजा करायलाही त्यांनी सुरुवात केली.

नवरात्रामध्ये शिवाजी पार्क खरे तर देशातल्या सर्वच भागातील परंपरांचे दर्शन घडवत असतो. एका बाजूला रामलीला असते, दुसऱया कोपऱयात गरबा चालतो. तिसऱया बाजूला दुर्गापूजा असते. सर्व वातावरण शक्तीच्या उपासनेमध्ये भारल्यासारखं असतं, पण यंदा शिवाजी पार्क सुनं सुनं आहे. बेंगाल क्लबच्या मोठय़ा मंडपात बंगालहून आलेले स्टॉल्स असतात. बंगाली साडय़ा, बांगडय़ा, कुमकुम, रसगुल्ले आदी बंगालची खासीयत तिथे उपलब्ध असते. यंदा यापैकी एकही स्टॉल इथे उभा नाही. बंगाली लोकगीतांचे कार्यक्रमही इथे होत असतात, पण यंदा देवीचा मुख्य मंडपही नाही. फक्त हॉलमध्ये देवी उभी केली असून पूजा होत आहे व या पूजेचं ऑनलाइन दर्शन भक्तांना दिलं जात आहे. षष्ठी ते दसरा असा पाच दिवस त्यांचा उत्सव असतो, पण यंदा सर्वत्र सामसूम दिसून येत आहे. उत्सवाचे एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे भोग, म्हणजे प्रसाद. तोही यंदा कोरोनाच्या सावटामुळे होणार नाही.

मुंबईत बंगाली लोक विखुरलेले आहेत. अंधेरी, पवई, नवी मुंबई, कुलाबा अशा ठिकाणी त्यांची संख्या दिसून येते. साहजिकच नंतरच्या काळात या भागातही दुर्गापूजा केली जाते. रानी मुखर्जीची दुर्गापूजाही प्रसिद्ध आहे, पण यंदा सर्वच ठिकाणी कोरोनाचे सावट आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे आहेत. त्यामुळे शांतिप्रिय समजल्या जाणाऱया बंगाली लोकांनीही गणेशोत्सव जसा साधेपणानं साजरा केला तशीच दुर्गापूजा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथल्या नियमांचं पालन करणं हे आम्ही आपलं कर्तव्यच मानतो अस क्लबच्या आयोजकांनी सांगितलं. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात लोकांनी गर्दी करू नये म्हणून आम्ही फक्त मूर्ती उभारली आहे व विधिवत पूजाही होत आहे. फक्त त्याचे दर्शन ऑनलाइन देत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या