
सामना प्रतिनिधी । नगर
शहराच्या मध्यभागी असलेल्या बंगाल चौकी येथे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली पोलीस चौकी शुक्रवारी महानगरपालिकेच्या अतिक्रण विभागाच्या पथकाने जमिनदोस्त केली आहे. त्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा कमी होणार आहे.
नगर शहरात पूर्वीच्या काळी पोलीस स्टेशन बरोबरीनेच त्या त्या भागात पोलीस चौक्या उभारल्या गेल्या. शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालय ते मार्केटयार्डकडे जाणार्या रस्त्यामध्ये बंगाल चौकी अशी जुनी ओळख असलेली चौकी ही रस्त्याच्या मधोमध होती. गेल्या काही वर्षापासून ही चौकी बंद अवस्थेमध्ये होती. त्यातच हा मार्ग शहराच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचा असल्याने ही चौकी रस्त्याला अडथळा ठरत होती. ब्रिटीश काळापासून ही चौकी येथे असल्याचे बोलले जात होते. या अगोदर येथील बारातोटी कारंजा उद्ध्वस्त केला होता. त्याच पाठोपाठ या परिसरातील ही चौकीही अतिक्रमण पथकाने जमिनदोस्त केली आहे.
































































