फेसबुकवर पुलवामा हल्ल्याचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्याला 5 वर्षांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेंगळुरूमधील विशेष न्यायालयाने पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल आनंद झाल्याची फेसबुक पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैज रशीद असे या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बेंगळुरूमधील कचरकनहल्लीचा रहिवासी असलेला रशीद फेब्रुवारी 2019 मध्ये अटक झाल्यापासून तुरुंगात आहे. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

तिसर्‍या सेमिस्टरच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असणाऱ्या फैज रशीदला 14 फेब्रुवारी 2019 रोजी अटक करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर त्याने फेसबुक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये या भ्याड कृत्याचा त्याच्याकडून आनंद साजरा करण्यात आला होता. दरम्यान या आरोपीला सोडण्याची मागणी न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, ‘आरोपी हा अशिक्षित किंवा सामान्य व्यक्ती नाही. गुन्हा घडला तेव्हा तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर जाणीवपूर्वक पुलवामा हल्ल्याबाबत पोस्ट केली होती. पुलवामा हल्ल्यातील महान शहीदांच्या मृत्यूबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. त्यामुळे आरोपीने केलेला गुन्हा या राष्ट्राविरोधी आणि गंभीर स्वरूपाचा आहे.

दरम्यान या फेसबुक पोस्टनंतर रशीदचा फोन जप्त करण्यात आला आणि त्याची फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासणी करण्यात आली होती. आरोपपत्रात, आयपीसी कलम 153A (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये वैर निर्माण करणे), 124A (देशद्रोह), 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे) आणि कलम 13 अंतर्गत बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.