बेस्ट बेकरी खटल्याचा फैसला पुन्हा लांबणीवर, सुनावणी 15 मार्चपर्यंत तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोध्रा जळीतकांडानंतर बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या 14 जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. हत्याकांडातील दोन आरोपींच्या कथित सहभागाबाबत मुंबई सत्र न्यायालय शनिवारी अंतिम निकाल जाहीर करणार होते, मात्र न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे अजून निकालपत्र पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे सुनावणी 15 मार्चपर्यंत तहकूब झाली. तब्बल 21 वर्षांनंतर 2 आरोपींबाबत न्यायालय निकाल देणार आहे.

1 मार्च 2002 रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला होता. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. सत्र न्यायालयात एकूण चार आरोपींविरुद्ध खटला उभा राहिला होता, मात्र दोघांचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण 10 साक्षीदार तपासले आहेत. हे दोघे दोषी की निर्दोष, याचा अंतिम निकाल न्यायालय देणार आहे. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे याची सुनावणी झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल शनिवारी जाहीर केला जाणार होता. त्यामुळे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले होते, मात्र न्यायालयाची निकालपत्र पूर्ण होऊ न शकल्याने निकाल 15 मार्चपर्यंत लांबणीवर पडला.