तिकीट मशीन बिघडल्यास कंडक्टरच्या पगारातून पैसे कापणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट प्रशासनाने बेस्टच्या तिकीट विक्रीसाठी दिलेल्या ई.टी.आय. मशीनची सर्व जबाबदारी आपल्या सर्व बस कंडक्टर आणि ग्राऊंड बुकिंगचे काम करणाऱ्या स्टाफवर सोपविली असून या मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तिकीट मशीनचे जे पार्ट बिघडतील त्याचे पैसे पगारातून कापणार असल्याचे परिपत्रकच काढले आहे.

बेस्ट प्रशासनाने ई.टी.आय. मशीनची देखभालीबाबत एक परिपत्रक काढले असून त्यात कंडक्टर आणि ग्राऊंड स्टाफला या संपूर्ण मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या तिकीट मशीनच्या सर्व सुटय़ा भागांचे दरपत्रक सोबतच दिले असून त्यात तिकीट मशीनच्या 15 सुटय़ा भागांची यादीच सादर केली आहे. सर्वात महाग पार्ट मेन बोर्डचा खर्च तब्बल 8,438 रुपये दाखविण्यात आला आहे. तर सर्वात स्वस्त पार्ट बझरची किंमत 456 रु. दर्शविली आहे. अशी तिकीट मशीनची किंमत 25,913 रुपये दर्शविली आहे. बेस्टच्या ताफ्यात वेटलिजेसच्या बसेसची संख्या हळूहळू वाढत असताना त्यांच्या महिन्याच्या पगारापेक्षाही अधिक या मशीनची किंमत असल्याने बेस्ट वर्कर्स युनियन उद्या वडाळा आगारात निदर्शने करणार आहे.