
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्टची बसची अपेक्षित वेळ प्रवाशांना मोबाईलवर समजण्याच्या आयटीएमएस प्रकल्पाची मार्च 2019 ही डेडलाइन पुन्हा चुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्टच्या बसेसचे संपूर्ण व्यवस्थापन इंटेलिजिंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे करण्याचा 112 कोटी रुपयांचा प्रकल्पाची तयारी अद्याप झालेली नसल्याने मुंबईकरांना मोबाईल ऍपवर बसचा मागोवा घेण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या बसेसचे नेमके ठिकाण समजण्यासाठी तिच्यामध्ये जीपीआरएसची चिप बसविण्याची योजना आहे. त्यासाठी व्होडाफोन किंवा कोणत्या कंपनीला कंत्राट द्यायचे याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे बेस्ट समितीच्या बैठकीत बुधवारी स्पष्ट झाले. भाजपचे सुनील गणाचार्य यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
2809 पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम
म्हणजे प्रवाशांना पुढील स्थानक कोणते याची उद्घोषणा करण्याची यंत्रणा बसविण्याचे काम 2809 बसेसमध्ये पूर्ण झाले आहे. तर 2470 बसेसमध्य जीपीएस डिव्हाइस बसविण्यात आले आहेत. बॅकबे, वडाळा, मुंबई सेंट्रल आदी सात डेपोंमध्ये पायलट तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले.
























































