
बेस्टच्या खासगी मिनी बसच्या कंत्राटी चालकांचे काम बंद आंदोलन सुरू असून त्यावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने प्रवाशांना इतर वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागला आहे. बेस्टच्या पाच आगारांतील एमपी ग्रुप कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांची वेतन व देणी थकविल्याने कंत्राटी चालकांनी संप पुकारला आहे. आज कंत्राटी सेवा असलेल्या पाच आगारांतून 275 पैकी 160 गाडय़ा सुटल्या तर 109 फेऱया गाडय़ा उपलब्ध नसल्याने तर 14 फेऱया चालक नसल्याने निघाल्या नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
बेस्टच्या कंत्राटी बसेसचे चालक गेल्या चार दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे कुर्ला, वांद्रे, कुलाबा, वडाळा आणि विक्रोळी या बसेसच्या आगारातील कंत्राटी मिनी बसेसचे काम ठप्प झाले आहे. प्रवाशांना या बसेसचा मोठा आधार होता. अवघ्या पाच रुपयांत साध्या तर सहा रुपयांत एसी मिनी बसने स्टेशन किंवा घर गाठता येत होते. आता वाढत्या महागाई प्रवाशांना झळ बसत आहे.




























































