
बेस्ट उपक्रमात विद्युत पुरवठा विभागात रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असणाऱया (कॅज्युअल लेबर) कर्मचारी वर्गाला लवकरच बेस्टमध्ये कायमस्वरूपी कामावर घेण्यात येणार आहे. गेली 14 वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारे हे कर्मचारी लवकरच कायमस्वरूपी तत्त्वावर बेस्टमध्ये नोकरीला लागणार आहेत.
बेस्टमधील रोजंदारी कर्मचाऱयांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे यासाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पाठपुरावा केला होता. हे कर्मचारी गेली 14 वर्षे बेस्टमध्ये रोजंदारी कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत.
हे रोजंदारी कर्मचारी बेस्टमधील कामगार वर्गाचीच मुले आहेत. त्यांच्या प्रश्नावर बेस्ट कामगार सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. या बाबतीत तातडीने लक्ष घालण्यासाठी बेस्ट प्रशासनाला सांगण्यात आले.
त्या अनुषंगाने बेस्ट प्रशासनाने सदर रोजंदारी कर्मचारी वर्गाला कामावर घेण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत आणि त्यांच्या सर्व कागदपत्रांच्या तपासणीचे काम आता सुरू होत आहे. रोजंदारी कर्मचारी वर्गाने याबाबत अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, कार्याध्यक्ष उदयपुमार आंबोनकर, उपाध्यक्ष उमेश सारंग, गणेश शिंदे, कमा नांदोस्कर, अशोक कदम व बेस्ट प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहेत.





























































